चाळीत गेले आहे या अभिनेत्याचे बालपण, आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होते गणना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 19:38 IST2020-01-31T19:37:07+5:302020-01-31T19:38:02+5:30
या अभिनेत्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

चाळीत गेले आहे या अभिनेत्याचे बालपण, आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होते गणना
विकी कौशलच्या भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा येत्या ३ फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. या चित्रपटासाठी तो प्रचंड उत्सुक असून विकीचे एक वेगळे रूप त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ते या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत आहे.
विकी सध्या यासोबतच सरदार उधम सिंग या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये विकीची गणना होते. विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. आज विकीविषयी एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
विकीचे बालपण एका चाळीत गेले. मालाडमध्ये 10 बाय 10 च्या घरात तो राहात होता. याविषयी त्यानेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याने म्हटले होते की, माझे वडील हे स्टंटमॅन होते. माझा जन्म झाला त्यावेळी देखील ते चित्रीकरणासाठी मुंबईच्या बाहेर होते. मला पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते प्रचंड खूश झाले होते. मी लहानपणापासून अभ्यासात हुशार होतो. त्याचसोबत शाळेतील विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. मी शालेय जीवनापासून चांगला अभिनय आणि डान्स करत असलो तरी मी अभिनेता बनण्याचे कधीच ठरवले नव्हते. माझे वडील शूटवर जायचे, त्यावेळी तुम्ही मला पण घेऊन जा... मला तुमच्या चित्रपटातील नायकाला भेटायचे आहे असे मी त्यांना सांगायचो. माझ्या घरात फिल्मी वातावरण नव्हते आणि आम्ही चित्रपटांविषयी घरी चर्चा देखील करायचो नाही. माझे वडील इंडस्ट्रीतील असले तरी माझे बालपण हे एखाद्या सामान्य मुलाप्रमाणे होते.