न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला विकी कौशलचा "छावा", परदेशात पण गाजतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 14:09 IST2025-02-17T14:09:25+5:302025-02-17T14:09:54+5:30
फक्त महाराष्ट्रात नाहीतर संपुर्ण देश आणि विदेशातही सर्वत्र 'छावा'ची तुफान चर्चा आहे.

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला विकी कौशलचा "छावा", परदेशात पण गाजतोय...
Vicky Kaushal: छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित 'छावा' चित्रपट (Chhaava) काल (14 फेब्रुवारी) देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. प्रदर्शित होताच 'छावा सिनेमाने महाराष्ट्रात सर्वांनाच वेड लावलं आहे. फक्त महाराष्ट्रात नाहीतर संपुर्ण देश आणि विदेशातही सर्वत्र 'छावा'ची तुफान चर्चा आहे. न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर "छावा"चा व्हिडीओ झळकला आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रेक्षकांसमोर मांडली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'बिग बजेट' सिनेमानं एक मोठा रेकॉर्ड केला आहे. न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित टाईम्स स्क्वेअरवर 'छावा' या मराठी चित्रपटाचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आलाय. सूरज मेहता नावाच्या तरुणानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात टाईम्स स्क्वेअरवर 'छावा' दिसून येत आहेत. संबंधित तरुणही टाईम्स स्क्वेअर इथं "नमः पार्वती पतये, हर-हर महादेव!" असा जयघोष करताना दिसून आला. हा व्हिडीओ विकीनं आपल्या इन्टास्टोरीवर पोस्ट केलाय.
शंभू राजेंच्या भुमिकेला विकीनं पुर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे डोळे अन् त्याची भेदक नजर सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. अक्षय खन्नाने देखील औरंगजेबची भूमिका केली आहे. अक्षय खन्नाच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी देखील दाद दिली आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. 'छावा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळतेय. छावा'चित्रपटाच्या निर्मितीसाठी १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाची कमाई पाहता लवकरच निर्मिती खर्च वसूल होईल असं दिसत आहे.