विकी कौशलचा उरीः द सर्जिकल स्ट्राईक पुन्हा होणार चित्रपटगृहात प्रदर्शित, जाणून घ्या काय आहे यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 05:25 PM2019-07-24T17:25:56+5:302019-07-24T17:31:58+5:30
विकीचा उरीः द सर्जिकल स्ट्राईल हा चित्रपट २६ जुलैला पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
विकी कौशलचाउरीः द सर्जिकल स्ट्राईल हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटाची कथा, विकीचा अभिनय सगळे काही प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. आता विकीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. प्रेक्षकांना त्यांचा हा आवडता चित्रपट आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या टीमकडूनच याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
उरीः द सर्जिकल स्ट्राईल हा चित्रपट २६ जुलैला पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी ही गोष्ट मंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या चित्रपटाद्वारे आम्ही भारतीय जवानांनी केलेली अतिशय महत्त्वाची कामगिरी पडद्यावर मांडली होती. मी उरी या चित्रपटाच्या टीमचा भाग असल्याने मी स्वतःला भाग्यशाली समजतो. हा चित्रपट कारगिल विजय दिवसच्या निमित्ताने ५०० चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.
उरीः द सर्जिकल स्ट्राईल या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धरने केले असून हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २४५.३६ कोटींचा गल्ला जमवला असून या वर्षातील सगळ्यात जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट १८ सप्टेंबर, २०१६ ला काश्मीरमधील उरीमध्ये भारतीय जवानांवर जो हल्ला झाला आणि त्याचे उत्तर देण्यासाठी भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केला त्यावर आधारित आहे.
उरीः द सर्जिकल स्ट्राईल या चित्रपटात विकीसोबतच यामी गौतम, परेश रावल आणि क्रिती कुल्हारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सगळ्यांचाच अभिनय प्रेक्षकांना भावला होता. त्यामुळे या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता प्रेक्षक पुन्हा एकदा हा चित्रपट पाहाण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करणार यात काहीच शंका नाही.