Video: ‘रानू मंडलदी’ने रेकॉर्ड केले तिसरे गाणे, अंदाज आहे खास!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 10:47 AM2019-09-03T10:47:07+5:302019-09-03T10:49:18+5:30
हिमेश रेशमियाने रानूच्या तिस-या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रानूचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतो.
कधी रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक स्टार आहेत. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने रानू दीला पहिला ब्रेक दिला आणि तिचे आयुष्य बदलले. हिमेश रेशमियाने रानूच्या तिस-या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रानूचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतो.
हिमेश रेशमियाने रानूला पहिली संधी दिली आणि तिच्यासोबत ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे रेकॉर्ड केले. यानंतर हिमेशने ‘आदत’ हे गाणेही रानू दीकडून रेकॉर्ड करून घेतले. आता हिमेशने रानू दीने गायलेल्या तिस-या गाण्याचा व्हिडीओ रिलीज केला आहे. या गाण्याची सगळ्यांत खास वैशिष्ट्य म्हणजे, रानू दीचा बदलेला अंदाज. होय, रानू दी अतिशय आत्मविश्वासाने गाणे गात आहे. हिमेशच्या बाजूला उभी होऊन अगदी हसत-खेळत ती गाणे एन्जॉय करते आहे. ‘आशिकी में तेरी’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे 2006 मध्ये रिलीज झालेल्या ‘36 चाइना टाऊन’ या चित्रपटातील ‘आशिकी में तेरी’ या गाण्याचा रिमेक आहे.
तिच्याबद्दल रोज नवे खुलासे होत आहेत. ताज्या मुलाखतीत, ‘रानू दी’ने आपल्या खासगी आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केलेत. सोबतच मुंबईत घर घेण्याची इच्छाही व्यक्त केली. ‘मी पाच-सहा गाणी रेकॉर्ड केली आहेत. वारंवार विमानाने माझ्या घरून मुंबईला येणे कठीण आहे. त्यामुळे मी मुंबईतच आपले घर घेऊ इच्छिते. हिमेश रेशमियासोबत दोन गाणी रेकॉर्ड केलीत. आता मला मुंबईतच राहायचे आहे,’ असे रानू दी म्हणाली.
आपल्या आयुष्याची कहाणी बरीच मोठी आहे. यावर एक चित्रपट बनू शकेल, असेही ती म्हणाली. मी फुटपाथवर जन्मली नव्हती. चांगल्या कुटुंबात माझा जन्म झाला. पण माझ्या वयाच्या 6 व्या वर्षी माझे आईवडिल एकमेकांपासून वेगळे झालेत. माझ्या आजीने मला सांभाळले. माझे गाण्यांवर पे्रम होते, म्हणून मी ती गात असे, असेही रानू दी म्हणाली.