शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये विद्या बालनसोबत झळकणार हा प्रसिद्ध मराठी अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 01:05 PM2019-06-17T13:05:53+5:302019-06-17T13:07:48+5:30
विद्या बालन प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत एक मराठी अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडची उलाला गर्ल म्हणजेच अभिनेत्री विद्या बालनने रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. विद्या नेहमी वेगवेगळ्या भूमिकांतून रसिकांसमोर आली आहे. आता ती प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटात तिच्यासोबत एक मराठी अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
वैभव तत्ववादीने कॉफी आणि बरंच काही, व्हॉट्सअप लग्न यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवले आहे. बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका यांसारख्या हिंदी चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. आता वैभव विद्या बालनसोबत काम करणार आहे. प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये वैभव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्यानेच स्वतः या चित्रपटात तो काम करणार असल्याचे दिव्यमराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की, या चित्रपटाला नुकतीच सुरुवात झाल्याने सध्या मी या चित्रपटाविषयी अधिक काहीही माहिती देऊ शकत नाही.
शकुंतला देवींच्या बायोपिकचे दिग्दर्शन अनु मेनन करणार असून विक्रम मल्होत्रा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा सिनेमा २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शकुंतला देवी यांचा जन्म १९२९ मध्ये बंगळूरूमध्ये झाला होता. लहानपणीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या बुद्धिमत्तेची प्रचिती आली होती. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर देखील अनेक पुस्तके लिहिली आहेत. १९८२ साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली.
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या बायोपिकबद्दल सांगितले की, “शकुंतला देवींसारख्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या भूमिकेला विद्या बालनसारखी अष्टपैलू अभिनेत्रीच योग्य न्याय देऊ शकते.” तर याबाबत अभिनेत्री विद्या बालन सांगते की, गणितज्ञ शकुंतला देवींची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यास मी खूप उत्सुक आहे. मी आणि विक्रमने याआधी ‘कहानी’साठी एकत्र काम केले असून शकुंतला देवींचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे. छोट्याशा गावातून आलेल्या या महिलेची गोष्ट चित्रपटातून दाखवणे आनंदाची बाब आहे.