विद्या बालनचं या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर कमबॅक, समोर आली रिलीज डेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 06:28 PM2023-05-08T18:28:58+5:302023-05-08T18:29:22+5:30
Vidya Balan : विद्या बालन शेवटची 'जलसा' चित्रपटात झळकली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची प्रतीक्षा होती त्या 'नीयत' (Neeyat) चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली. या थरारपटामध्ये अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही प्रमुख भूमिकेत असून तिचे चाहते या चित्रपटाची बरेच दिवस वाट पाहात आहेत. हा चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. २०२० साली प्रदर्शित झालेल्या शकुंतला देवी चित्रपटाचे दिग्दर्शन अनू मेनन यांनी केले होते. शकुंतला देवी चित्रपटातही विद्या बालन प्रमुख भूमिकेत होती. ही जोडी नीयत चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली आहे.
अनू मेनन यांनी 'किलिंग इव्ह' या आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झालेल्या वेबसिरीजचे बरेच भाग दिग्दर्शित केले असून त्यांच्या दिग्दर्शन कौशल्याचे विशेष करून कौतुक केले जात आहे. अनू मेनन यांनी दिग्दर्शित केलेल्या नीयत चित्रपटामध्ये दमदार कलाकारांची फौज असून प्रमुख भूमिकांमध्ये राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, अमृता पुरी, शहाना गोस्वामी, निकी वालिया, दीपानिता शर्मा, शशांक अरोरा, प्राजक्ता कोळी, दानेश रझवी, इशिका मेहरा आणि माधव देवल हे दिसणार आहेत. नीयत चित्रपटाची कथा अनू मेनन, प्रिया वेंकटरमण, अद्वैत काला आणि गिरवानी ध्यानी यांनी लिहिली आहे तर चित्रपटाचे संवाद हे कौसर मुनीर यांनी लिहिले आहेत.
मानवी संगणक म्हणून गौरवल्या गेलेल्या प्रख्यात गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विक्रम मल्होत्रा यांच्या अबंडेंटिया एंटरटेनमेंटने ‘नीयत’ या चित्रपटाची निर्मिती केली असून प्राईम व्हिडीओ हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नीयत चित्रपटाची कथा ही विद्या बालनच्या अवतीभोवती फिरणारी आहे. या चित्रपटात विद्याने एका पार्टीमध्ये झालेल्या अब्जाधीशाच्या खुनामागचे सत्य कसे शोधून काढले हे दाखवण्यात आले आहे. या अब्जाधीशाच्या खुनामध्ये ज्यांच्यावर संशय आहे त्यांची प्रत्येकाची काही ना काहीतरी गुपिते किंवा भानगडी आहेत, जी चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतशी उलगडत जातात. ज्यामुळे चित्रपटातील गूढ आणखीनच वाढत जाते.
२०२० साली प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या शकुंतला देवी चित्रपटातील विद्या बालनच्या भूमिकेचे बरेच कौतुक झाले होते. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या शेरनी आणि २०२२ साली प्रदर्शित झालेल्या जलसा चित्रपटातही विद्या बालन प्रमुख भूमिकांमध्ये दिसली होती. या चित्रपटांमधील अभिनयासाठी तिला विविध पुरस्कारही मिळाले आहेत. 'नीयत' चित्रपटामुळे 'शकुंतला देवी' चित्रपटाच्या निर्मितीत प्रमुख भूमिका बजावणारे अबंडेंटिया एंटरटेनमेंट, अनू मेनन, विद्या बालन आणि प्राईम व्हिडीओ हे सगळे पुन्हा एकत्र आले आहेत.