Liger Movie Review : साऊथस्टार विजय देवरकोंडाचा 'लायगर' बघावा की नाही वाचा रिव्ह्यू...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 04:10 PM2022-08-26T16:10:01+5:302022-08-26T16:11:50+5:30

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला विजय देवरकोंडा 'लायगर सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Vijay Devarakonda and Ananya Pandey starr Liger movie review | Liger Movie Review : साऊथस्टार विजय देवरकोंडाचा 'लायगर' बघावा की नाही वाचा रिव्ह्यू...

Liger Movie Review : साऊथस्टार विजय देवरकोंडाचा 'लायगर' बघावा की नाही वाचा रिव्ह्यू...

googlenewsNext

कलाकार - विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, रम्या कृष्णन, रोनित रॅाय, विष्णू रेड्डी, अली, मकरंद देशपांडे, चंकी पांडे, माईक टायसन
लेखक-दिग्दर्शक - पुरी जगन्नाथ
निर्माते - करण जोहर, पुरी जगन्नाथ, चार्मी कौर, अपूर्वा मेहता, हिरू यश जोहर
शैली - स्पोर्टस अ‍ॅक्शन ड्रामा
कालावधी - दोन तास २० मिनिटे
चित्रपट परीक्षण- संजय घावरे 
दर्जा :  दीड स्टार 

दक्षिणेकडील एखादा स्टार जेव्हा हिंदीत एन्ट्री करतो, तेव्हा सर्वांनाच त्याबाबत कुतूहल असतं. विजय देवरकोंडा हा दक्षिणेकडील गाजलेला स्टार हिंदीत दाखल होणार असल्यानं या चित्रपटाकडूनही प्रचंड अपेक्षा होत्या, पण त्या सर्व फोल ठरल्या आहेत. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी सादर केलेला लायगर हा जरी भाषेनं हिंदी असला तरी वागणूकीनं दक्षिणेकडचाच आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. विजयसारखा जबरदस्त फॅन फॅालोईंग असणारा कलाकार हिंदीत पदार्पण करताना हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी भन्नाट करणं अपेक्षित होतं, पण तसं झालेलं नाही.

मूळचा बनारसचा असणारा लायगर आणि त्याची आई शिवमणी मुंबईत चहा विकून उदरनिर्वाह करत असतात. लायगरचे वडील लायन बॅाक्सर आणि आई एखाद्या वाघिणीसारखी असल्यानं तिनं त्याचं नाव लायगर ठेवलेलं असतं. हाणामारी करण्यात पटाईत असणाऱ्या लायगरनं वडीलांपेक्षा मोठा फायटर बनून नाव कमवावं यासाठी आई त्याला एमएमए मास्टरकडे नेते. लायगरच्या ट्रेनिंगसाठी पैसे भरण्याची ऐपत नसल्याने तो पडेल ते काम करून शिकेल असं सांगते. दुसरीकडे लायगरच्या जीवनात तान्या नावाची मुलगी येते. लायगरच्या फायटींगवर फिदा असल्याने तान्या त्याच्या प्रेमात पडते. आई मात्र लायगरला मुलींपासून दूर रहायला सांगत असते. अशातच लायगरची मोठी उणीव समजल्याने तान्या लायगरला नकार देते. त्यानंतर लायगर फायटिंगवर फोकस करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचतो.

लेखन-दिग्दर्शन - बेसलेस प्लॅाटवर लिहिण्यात आलेली भावनाशून्य कथा या चित्रपटात आहे. पुरी यांनी टिपिकल साऊथ इंडियान शैलीतील स्टोरी लिहून दिग्दर्शन केलं असून ते हिंदीत खपवण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटात काय चांगलं आहे हे सांगण्याऐवजी काय वाईट आहे याचीच संख्या जास्त आहे. लायगर आणि त्याची आई कोणत्याही अँगलनं बनारसी वाटत नाही. याउलट ते साऊथ इंडियनच वाटतात. रम्या कृष्णनला मेकअपच्या सहाय्याने तरी चहा विक्रेती दाखवण्याचा प्रयत्न करायला हवा होता. गरीब असली तरी ती शिवगामीच्याच रुबाबात वावरते. लायगर कोचकडे शिकायला जातो, पण कोचिंगमधील बारकावे सांगण्याऐवजी तत्त्वज्ञानाचे धडे देतो. त्याचं फायटिंग स्कील न पाहताच सर्व विद्यार्थ्यांना त्याच्याशी लढायला सांगतो. गुरूकडून कोणतेही धडे न घेता लायगर जणू आईच्या पोटातूनच अ‍ॅक्शन शिकून आलेला वाटतो. आई-मुलाचा अँगल वगळता यात एकही मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आलेला नाही. बॅाक्सिंगची जणू खिल्लीच उडवली गेली आहे. हे इतकं सोपं असतं तर कोणीही फायटर बनलं असतं. क्लायमॅक्समध्ये कहर केला आहे. आंतरराष्ट्रीय एमएमए चॅम्पियनशिपच्या फायनल राऊंडसाठी रिंगमध्ये सर्व लायगरची वाट पहात असतात, पण लायगर व्हिलनच्या तावडीतून हिरोईनला सोडवायला जातो. तिथून रिंगमध्ये हिरोचा लाईव्ह टेलिकास्ट सुरू होतो. त्यानंतर सिनेमा संपतो. चॅम्पियनशिपचा फायनल राऊंड मनातल्या मनात बघा असंच काहीसं दिग्दर्शकानं सांगितलं आहे. श्रवणीय नसलेली गाणी कधीही अचानक सुरू होतात. कॅमेरावर्क चांगलं आहे. अ‍ॅक्शन सीन्सही जबरदस्त झाले आहेत.

अभिनय : विजय देवरकोंडानं आपली भूमिका प्रमाणिकपणे साकारली आहे. त्याची अभिनयशैली, संवादफेक, आवाज, अ‍ॅक्शन खूप छान आहेत. त्याच्यासारख्या कलाकाराची हिंदीत एंट्री करण्यासाठी यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. अनन्या पांडेनं दक्षिणात्य शैलीतील मॅड नायिकेची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. रम्या कृष्णन कुठल्याही दृश्यात रंजलेली-गांजलेली वाटत नाही. रोनित रॅाय कोचच्या भूमिकेत असला तरी शिष्याला धडे देताना दिसत नाही. ट्रेनमधील एका दृश्यात अतुल परचुरेने पुरेपूर हसवण्याचे काम केले आहे. माईक टायसनची व्यक्तिरेखाही प्रभावी वाटली नाही. चंकी पांडे, मकरंद देशपांडे, अली यांनी आपल्या वाटेला आलेलं काम नीट केलं आहे.

सकारात्मक बाजू : विजयचा अभिनय, अ‍ॅक्शन सीन्स, कॅमेरावर्क, गाण्यांमधील लोकेशन्स
नकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, वातावरणनिर्मिती, सादरीकरण, गीत-संगीत, संकलन
थोडक्यात : हा चित्रपट कितीही वाईट झाला असला तरी दक्षिणेत चांगला बिझनेस करणारा असून, हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकांच्या पदरी मात्र निराशा देणारा आहे.
 

Web Title: Vijay Devarakonda and Ananya Pandey starr Liger movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.