मला पण 21 वर्षांची मुलगी आहे...! जेलमधून बाहेर येताच विनयभंगाच्या आरोपावर बोलला अभिनेता विजय राज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 12:29 PM2020-11-13T12:29:51+5:302020-11-13T12:46:01+5:30
‘शेरनी’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सेटवरील महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अलीकडे अभिनेता विजय राजला अटक झाला होती.
‘शेरनी’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सेटवरील महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अलीकडे अभिनेता विजय राजला अटक झाला होती. सध्या विजय राज जामीनावर बाहेर आहे. मात्र या प्रकरणानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी विजय राजला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता या संपूर्ण घटनाक्रमावर विजय राजने पहिल्यांदा चुप्पी तोडली आहे.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तो यावर बोलला. महिलांची सुरक्षा, त्यांचा आदर हे सगळे मी समजतो. मी सुद्धा एका 21 वर्षांच्या मुलीचा बाप आहे. कोणी काही बोलले आणि लोकांनी ते खरे मानले. चौकशीशिवाय मला दोषी ठरवले गेले. मला चित्रपटातून काढले गेले, हे दुर्दैवी आहे, असे विजय राज म्हणाला.
काय म्हणाला विजय राज
मी खूप कष्टाने माझे करिअर उभे केले आहे. कोणी जाणीवपूर्वक एखाद्याचे करिअर कसे उद्धवस्त करू शकतो? कोणी काही बोलले आणि मी शोषण करणारा आहे, हे तुम्ही खरे कसे मानू शकता? चौकशीआधीच मी दोषी आहे, हे कसे ठरवू शकता? माझे वृद्ध पिता दिल्लीत आहेत. त्यांना आणि माझ्या मुलीला समाजाचा सामना करावा लागणार आहे. मी एक वर्षांपाूसन या टीमसोबत काम करतोय. आम्ही सेटवर एकत्र क्रिकेट खेळायचा. ती महिला अनकम्फर्टेबल आहे, असे जाणवताच मी तिची माफी मागितली होती, ती सुद्धा संपूर्ण टीमसमोर. सॉरी म्हणणे याचा अर्थ प्रत्येकदा तुमची चूक आहे, असा होत नाही. तुम्हाला समोरच्याच्या भावनांची काळजी आहे, असाही सॉरीचा एक अर्थ होतो, असे या संपूर्ण प्रकरणावर विजय राज म्हणाला.
काय आहे प्रकरण?
विजय राजने त्याच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्टाफमधील ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. ‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चित्रपटातील कलाकार मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आणि गोंदियातील हॉटेल गेटवे इथे मुक्कामास होते. गोंदियातील हॉटेल गेटवे इथे विजय राजने पीडितेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला गेलाय.
अभिनेता विजय राजला पोलिसांनी केली अटक, स्टाफमधील सहकारी तरुणीची काढली छेड