Vikram Movie Review : फायर की फ्लॉवर....कसा आहे कमल हासनचा ‘विक्रम’? वाचा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 03:58 PM2022-06-04T15:58:33+5:302022-06-04T16:13:16+5:30

Vikram Movie Review in marathi : आजवर कमल हासन यांनी नेहमीच वेगळ्या वाटेनं जाणारे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी काही चित्रपट यशस्वीही झाले आहेत. त्यामुळं कमलच्या चित्रपटांकडून नेहमीच खूप अपेक्षा असतात. कसा आहे ‘विक्रम’ हा नवा चित्रपट?

Vikram Movie Review in marathi Kamal Haasan, Vijay Sethupathi and Fahadh Faasil | Vikram Movie Review : फायर की फ्लॉवर....कसा आहे कमल हासनचा ‘विक्रम’? वाचा रिव्ह्यू

Vikram Movie Review : फायर की फ्लॉवर....कसा आहे कमल हासनचा ‘विक्रम’? वाचा रिव्ह्यू

googlenewsNext

 संजय घावरे
..........................

दर्जा : **  

कलाकार : कमल हसन, विजय सेतुपती, फहाद फासील, नरेन, कालिदास जयराम, गायत्री शंकर, वासंती, 
लेखक-दिग्दर्शक : लोकेश कनगराज
निर्माता :कमल हासन, आर. महेंद्रन
शैली : अ‍ॅक्शन-थ्रिलर
कालावधी : २ तास ५३ मिनिटे
..............................

Vikram Movie Review : आजवर कमल हासन (Kamal Haasan) यांनी नेहमीच वेगळ्या वाटेनं जाणारे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी काही चित्रपट यशस्वीही झाले आहेत. त्यामुळं कमलच्या चित्रपटांकडून नेहमीच खूप अपेक्षा असतात, पण ‘विक्रम : हिटलीस्ट’ (Vikram ) हा चित्रपट मात्र मोठ्या घरचा पोकळ वासाच ठरला आहे. अंमली पदार्थांची तस्करी आणि गुप्तचर यंत्रणांमधील संघर्ष यापूर्वीही अनेकदा समोर आला आहे. या चित्रपटाचं कथानकही अशाच गोष्टींवर आधारलेलं असल्यानं शिळ्या कढीला पुन्हा कढ काढण्याचा हा प्रयत्न वाटतो. उत्कंठावर्धक आणि उत्सुकता जागवणार्‍या घटनांचा समावेश करून थरार निर्माण करण्यात दिग्दर्शक लोकेश कनगराज यशस्वी होऊ शकलेले नाहीत.

चित्रपटाची सुरुवात कोकीन बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या अंदाजे दोन लाख कोटी रुपये किमतीच्या कच्च्या मालाने भरलेल्या कंटेनरपासून होते. प्रपंचन नावाचा तरुण या कंटेनरचा शोध लावतो आणि त्याची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो, पण प्रपंचनची हत्या होते. त्यानंतर प्रत्येक सात दिवसांच्या अंतराने सरकारी व्यवस्थेतील मोठ्या हुद्द्यांवर असणार्‍या अधिकार्‍यांची हत्या करण्याचं सत्र सुरू होतं. यात प्रपंचनचे दत्तक वडील करनन यांचीही हत्या केली जाते. या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी अमर नावाच्या अधिकार्‍याकडे सोपवण्यात येते. कोणत्याही बंधनात न राहता तपास सुरू करणार्‍या अमरला बर्‍याच गोष्टी समजतात. ज्याचा उलगडा चित्रपटात करण्यात आला आहे.

लेखन-दिग्दर्शन : पटकथेची मांडणी वेगळ्या पद्धतीने करूनही जुन्याच विषयावर आधारलेलं कथानक कंटाळा आणतं. कमल हासन यांनाच हिरो बनवण्याच्या नादात दिग्दर्शकांनी चित्रपटाचा बट्ट्याबोळ केल्याचं जाणवतं.

चित्रपट सुरू झाल्यापासून कथानक अतिशय संथ गतीनं पुढे सरकत असल्यामुळं कंटाळा येतो. उत्कंठा वाढवणार्‍या रोमांचक घटनांचा अभाव हा या चित्रपटातील सर्वात मोठा मायनस पॉइंट आहे. सुरुवातीलाच नायकाची हत्या झाल्याचं दाखवण्यात आलं असलं तरी ते पटत नाही. थोड्या वेळाने तो पुन्हा येईल आणि खलनायकाला धूळ चारेल असं सारखं वाटत राहतं. सिनेमातही अगदी तसंच घडतं. यात कमल हासन यांनी आजोबांची भूमिका साकारली असली तरी तेच हिरो आहेत. मध्यंतरानंतर काही वळणं आश्चर्यचकीत करतात, पण तोपर्यंत खूप उशीर होतो. लांबलचक साहसदृश्यांना कात्री लावून चित्रपटाची लांबी कमी करण्याची गरज होती. क्लायमॅक्समध्ये कमल हासन जेव्हा तोफ सदृश गनद्वारे खलनायकाच्या सेनेवर हल्लाबोल करताता, तेव्हा ‘केजीएफ २’मधील रॉकीभाईची आठवण येते. चित्रपटाचा विषय खूप छोटा होता. त्याची मांडणी सुरेख करण्याची गरज होती. काहीतरी भव्य दिव्य दाखवण्याच्या नादात होत्याचं नव्हतं झालं आहे. कॅमेरावर्क आणि इतर तांत्रिक बाबी चांगल्या आहेत.

अभिनय : कमल हासन यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता त्यांनी मुख्य भूमिकेत काम करू नये असं हा चित्रपट पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं. आजोबांच्या भूमिकेत असलो तरी काय झालं मीच नायक असा अट्टाहास कशासाठी हा प्रश्न पडतो. विजय सेतुपतीनं साकारलेला ड्रग्ज माफिया खलनायक खतरनाक वाटतो. त्याची भली मोठी फॅमिली दाखवण्यामागील कारण समजत नाही. फहाद फासीलनं काम चांगलं केलं असलं तरी ते कॅरेक्टर आणखी प्रभावी वाटणं गरजेचं होतं. पत्नीच्या रूपात गायत्री शंकरनं फहादला चांगली साथ दिली आहे. इतर सर्व कलाकारांनी आपापल्या परीनं स्वत:च्या वाट्याला आलेलं काम चोख बजावलं आहे.

नकारात्मक बाजू : चित्रपटाची लांबी खूप मोठी आहे. काही ठिकाणी कलाकारही थकल्यासारखे वाटतात. गीत-संगीताची बाजूही तितकीशी प्रभावित करत नाही.

सकारात्मक बाजू : कमल हासन यांच्या चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. त्यांच्या चित्रपटात जे अपेक्षित असतं ते मनोरंजनाचे सर्व मसाले यात ठासून भरलेले आहेत.

थोडक्यात : जवळपास तीन तासांचा कालावधी असलेला हा चित्रपट पाहताना कंटाळा येतो. त्यामुळं पैसे आणि वेळेचा अपव्यय टाळायचा असेल तर यापासून दूर राहिलेलंच बरं.

Web Title: Vikram Movie Review in marathi Kamal Haasan, Vijay Sethupathi and Fahadh Faasil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.