'या' स्टारकीडसोबत झळकणार विक्रांत मेस्सी, डेहराडूनमध्ये शूटिंग सुरु; नंतर घेणार मोठा ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:23 IST2024-12-05T09:23:10+5:302024-12-05T09:23:45+5:30
पुढील वर्षी विक्रांतचे शेवटचे २ सिनेमे रिलीज होणार

'या' स्टारकीडसोबत झळकणार विक्रांत मेस्सी, डेहराडूनमध्ये शूटिंग सुरु; नंतर घेणार मोठा ब्रेक
अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) १२th फेल सिनेमानंतर चांगलाच चर्चेत आला. सिनेमातील विक्रांतच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. सिनेसृष्टीला आणखी एक प्रतिभावान अभिनेता मिळाला. नुकताच त्याचा 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाही रिलीज झाला. यातही त्याच्या कामाचं कौतुक झालं. दरम्यान विक्रांतने अचानक फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर करत सर्वांना धक्का दिला. पुढील वर्षी विक्रांतचे २ सिनेमे रिलीज होणार असून नंतर तो मोठ्या ब्रेक वर जाणार आहे.
३७ वर्षीय विक्रांतने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केली. व्यस्त शेड्युलमुळे कुटुंबाला वेळ देता येत नसल्याने कामातून मोठा ब्रेक घेत असल्याचं तो म्हणाला. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली. २०२५ मध्ये विक्रांतचे दोन सिनेमे येणार आहे जे शेवटचे असतील. 'आँखो की गुस्ताखियाँ' हा त्यातला एक सिनेमा. नंतर तो पुन्हा कधी कमबॅक करणार हे येणारा काळच ठरवेल. चाहत्यांना हे वाचून चांगलाच धक्का बसला आहे.
'या' स्टारकीडसोबत दिसणार विक्रांत
विक्रांत मेस्सीने डेहराडून येथे 'आँखो की गुस्ताखिया' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमात शनाया कपूर (Shanaya Kapoor) मुख्य भूमिकेत आहे. स्टारकीड शनाया या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शनाया ही अभिनेता संजय कपूरची लेक आहे. २५ वर्षीय शनायासोबत विक्रांत मेस्सीची जोडी जमली आहे.
शनाया कपूर याआधी करण जोहरच्या 'बेधडक' सिनेमातून पदार्पण करणार होती. मात्र काही कारणांमुळे हा सिनेमा डबाबंद झाला. यामुळे तिला खूप दु:ख झाल होतं.