विनोद खन्ना यांच्या पत्नी गितांजली तरुणपणी दिसायच्या खूप सुंदर, काही वर्षांपूर्वी झाले निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:18 PM2021-02-20T16:18:59+5:302021-02-20T16:23:23+5:30
गितांजली या विनोद खन्ना यांच्या पहिल्या पत्नी असून अक्षय आणि राहुल अशी त्यांना दोन मुलं आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि हॅडसम अभिनेते असा लौकिक मिळवणारे अभिनेता म्हणजे विनोद खन्ना. आपल्या अभिनयाने विनोद खन्ना यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. त्यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, मुकद्दर का सिंकदर, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, अमर अकबर अँन्थनी, राजपूत, कुरबानी, कुदरत, दयावान, कारनामा, सुर्या, जुर्म या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. पदार्पण करताना त्यांना नायकाची भूमिका मिळाली नाही. सुरुवातीला साहाय्यक अभिनेता, खलनायक अशा भूमिका त्यांनी केल्या. मेरा गाव, मेरा देशमधील त्यांनी खलनायकाची भूमिका विशेष गाजली होती. अचानकमधील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्यांना दाद दिली.
विनोद खन्ना यांनी दोन लग्नं केली होती. गितांजली या विनोद खन्ना यांच्या पहिल्या पत्नी असून अक्षय आणि राहुल अशी त्यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून अभिनयक्षेत्रात प्रवेश केला होता. अक्षयने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. पण तसे यश राहुलला मिळवता आले नाही.
१९७१ मध्ये विनोद खन्ना यांनी गीतांजलीसोबत लग्न केले होते. पण अचानक विनोद खन्ना आपले फिल्मी करिअर, कुटुंब सगळे काही मागे सोडून ओशोच्या सेवेत लागले. ओशोच्या सेवेत ते असे काही गुंतले की, त्यांनी कुटुंबापासून फारकत घेतली. सगळे काही सोडून विनोद यांनी अमेरिकेत ओशो कम्युन रजनीशपूरममध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गीतांजली यांच्यासाठी हा निर्णय धक्कादायक होता. विनोद यांच्या या निर्णयाने गीतांजली यांनी अक्षय व राहुल या दोन मुलांना घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी विनोद यांना घटस्फोट दिला.
घटस्फोटानंतर पाच वर्षांनी विनोद खन्ना मुंबईला परतले आणि त्यांनी नव्याने आयुष्य सुुरू करण्याचा निर्णय घेतला. १९९० मध्ये त्यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले. कवितापासून विनोद खन्ना यांना साक्षी व श्रद्धा अशी दोन मुले आहेत. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट होऊनही विनोद यांनी पित्याचे कर्तव्य निभावले. अक्षय खन्नाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी त्यांनी ‘हिमालय पुत्र’ हा चित्रपट बनवला. राहुलचे करिअरही त्यांनी मार्गी लावले. २७ एप्रिल २०१७ रोजी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पहिल्या पत्नी गीतांजली यांनीही 15 डिसेंबर 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला.