Fake होता रानू मंडलचा तो व्हायरल फोटो, मग ‘सत्य’ आहे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 11:05 AM2019-11-22T11:05:10+5:302019-11-22T11:05:59+5:30
मेकअपमधील रानूचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि या मेकअपमुळे रानू ट्रोल झाली होती.
एका व्हायरल व्हिडीओमुळे अचानक प्रसिद्धिच्या झोतात आलेली रानू मंडल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अगदी अलीकडे एका चाहतीशी आणि मीडियाशी फटकून वागल्याने रानू चर्चेत आली होती. यानंतर तिच्या मेकओव्हरचा व्हिडीओ चर्चेत आला होता. मेकअपमधील रानूचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि या मेकअपमुळे रानू ट्रोल झाली होती.
रानूचा हा हेवी मेकअप केलेला फोटो एका ब्यूटी इव्हेंटमधील असल्याचे म्हटले जात होते. या फोटोमध्ये रानूने डिझायनर कपडे घातले होते. सोबत हेवी मेकअप, हेवी ज्वेलरी असा तिचा लूक होता. तिचा हा अवतार पाहून अनेकजण सोशल मीडियावर रानू मंडलची खिल्ली उडवली होती. विशेषत: ट्विटरवर तिच्या या लुकवर अनेक मीम्स शेअर केले गेले होते.
पण आता रानूचे मेकअप करणारी मेकअप आर्टिस्ट संध्या हिने तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर रानूचा खरा फोटो शेअर केला आहे. रानूचा हेवी मेकअपचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो हा फोटोशॉप्ड असल्याचा दावा या मेकअप आर्टिस्टने केला आहे.
‘तुम्ही पाहू शकता खरा मेकओव्हर आणि बनावट फोटोत किती फरक आहे. तुमच्या जोक्स आणि मीम्समुळे अनेकांचे मनोरंजन झाले असेल. पण कुणाच्या भावना दुखावणे चुकीचे आहे. आशा आहे, तुम्ही ख-या - खोट्यातील फरक समजू शकाल,’ असे या मेकअप आर्टिस्टने लिहिले आहे.