"शंभूराजे, धगधगत्या आयुष्यातून..." 'छावा' पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:57 IST2025-02-24T12:21:35+5:302025-02-24T12:57:33+5:30
'छावा' हा केवळ चित्रपट न राहता इतिहासाचा जिवंत अनुभव ठरतोय.

"शंभूराजे, धगधगत्या आयुष्यातून..." 'छावा' पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील नेमकं काय म्हणाले?
Vishwas Nangare Patil: 'छावा' सिनेमाची (Chhaava) चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकत आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) लक्षवेधी ठरतोय. मराठीसह बॉलिवूड कलाविश्वातील अनेक कलाकारांसह राजकारणी आणि इतर दिग्गज मंडळीदेखील 'छावा' चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. 'छावा' पाहिल्यानंतर प्रत्येक जण भारावून जात आहे. नुकतंच आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी 'छावा' चित्रपट पाहिला. यानंतर त्यांनी केलेली पोस्ट (Vishwas Nangare Patil on Chhaava Movie) चर्चेत आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी छावा पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली.
"छावा... ज़िंदा रहे... काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून काढली जाते. सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते! 'मन के जीते जीत, मन के हारे हार, हार गये जो बिनलढे, उनपर हैं धिक्कार!' केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द! स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात.
हाथी घोडे, तोफ तलवारे
फौज तो तेरी सारी हैं
पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा
अब भी सब पे भारी हैं!छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे, मराठी माणसाच्या स्वभिमानाचे, स्फुल्लिंगाचे प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही. प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला! काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून?
आम्ही घ्यावा निर्भयपणा,
आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी,
विचारांची आणि कृतींची
आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुसमटलेलं जगणं,
घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द,
करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म!
समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा!
राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी,
शेर शिवराज आणि त्यांचा छावा!
जगदंब जगदंब!"
या शब्दात विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. 'छावा' चित्रपटाला देशातूनच नाहीतर परदेशातूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत ३२६.७२ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
भव्यदिव्य दृश्ये, दमदार अभिनय आणि मनाला भिडणारे संवाद यामुळे 'छावा' हा केवळ चित्रपट न राहता इतिहासाचा जिवंत अनुभव ठरतोय.