महाभारतावर सिनेमा बनवणार विवेक अग्निहोत्री, म्हणाले, "इतरांसारखं बॉक्स ऑफिससाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 01:24 PM2023-08-17T13:24:37+5:302023-08-17T13:26:27+5:30
महाभारत हे धर्म आणि अधर्म मधली लढाई आहे. मी महाभारताकडे याच नजरेने बघतो.
'द काश्मीर फाईल्स' फेम दिग्दर्शक निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आगामी 'द व्हॅक्सीन वॉर' (The Vaccine War) सिनेमामुळे चर्चेत आहेत. पुढील महिन्यात सिनेमा प्रदर्शित होतोय.सध्या विवेक अग्निहोत्री सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मुलाखती देत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी महाभारतावर फिल्म बनवायचा विचार असल्याचा खुलासा केला. यामुळे अनेक जणांचे कान त्यांच्याकडे वळले आहेत.
विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'मी माझं संपूर्ण आयुष्य वाचन, संशोधन, परिक्षण यात घातलं आहे. माझ्या भाषणातून मी तेच उलगडत असतो. जर मला पौराणिक कथांवर चित्रपट बनवायचे असतील तर मी ते इतिहासासारखे बनवेन. बाकी लोक बॉक्सऑफिससाठी काहीही बनवत आहेत. पण मी प्रेक्षकांसाठी बनवणार आहे. इतरांनी अर्जुन, भीम आणि बाकीच्यांना खूप चढवून दाखवलं आहे जेव्हा की माझ्यासाठी महाभारत हे धर्म आणि अधर्म मधली लढाई आहे. मी महाभारताकडे याच नजरेने बघतो. महाभारताचा मूळ संदेश पोहोचवण्यासाठीच मला त्यावर सिनेमा बनवायचा आहे.'
विवेक अग्निहोत्रींनी स्वातंत्र्यदिनाला 'द व्हॅक्सीन वॉर' चा टीझर रिलीज केला. २८ सप्टेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होतोय. यामध्ये अनुपम खेर, नाना पाटेकर, राइमा सेन, सप्तमी गौडा, गिरीजा ओक आणि पल्लवी जोशी यांच्या भूमिका आहेत. भारतात कोव्हिड 19 व्हॅक्सीन कशी बनवली गेली यावर कहाणी आधारित आहे. सिनेमा ११ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.