विवेक ओबेरॉयला बिझनेस पार्टनरनेच दीड कोटींना फसवलं, झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 06:09 PM2023-10-02T18:09:53+5:302023-10-02T18:11:46+5:30
विवेक ओबेरॉयची फसवणूक करणाऱ्या संजय साहा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटींची फसवणूक झाल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. याप्रकरणी अभिनेत्याने पोलिसांत धाव घेत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणातील नवी अपडेट समोर आली आहे. विवेक ओबेरॉयची फसवणूक करणाऱ्या संजय साहा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
विवेक ओबेरॉयने निर्माता संजय साहा, नंदिता साहा आणि राधिका नंदासह इतर काही जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आयपीसी कलम ४०६,कलम ४०९, कलम ४२० आणि कलम ३४ अंतर्गत या तिघांविरोधता गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत संजय साहा यांना अट केली. या प्रकरणात दोषी असलेल्या इतर दोघांचा शोध सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
ओबेरॉय मेगा एन्टरटेन्मेंटचे लेखापाल देवेन बाफना (५७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ फेब्रुवारी २०१७ रोजी ओबेरॉय ऑरगॅनिक एलएलपीची स्थापना झाली. विवेक आणि त्यांची पत्नी प्रियंका या फर्मचे भागीदार आहेत. ऑरगॅनिक क्षेत्रात जास्त मागणी न मिळाल्याने त्यांनी सिनेक्षेत्रात काम करण्याचे ठरवले. याच दरम्यान विवेक यांची संजय साहा यांच्याशी ओळख झाली. साहा यांना चित्रपट निर्मितीचा अनुभव असल्याने एकत्रित काम करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे संजय साहा यांच्यासह, नंदिता साहा, राधिका नंदा यांनाही त्यांच्या फर्ममध्ये भागीदार बनवले.
पुढे त्यांनी, आनंदिता एन्टरटेन्मेंट एलएलपी ही फर्म स्थापन केली. यामध्ये विवेक ओबेरॉय यांना वैयक्तिक खात्यातून तसेच ओबेराय मेगा एन्टरटेन्मेंट एलएलपी या फर्ममधून एकूण ९५,७२,८१४ ही रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. वेळोवेळी विविध कारणे पुढे करत, आनंदिता फर्मला कुठलीही माहिती न देता विवेक यांच्या १,५५,७२,८१४ रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. ४ फेब्रुवारी २०२० ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.