प्रियंकानंतर विवेक ओबेरॉयने समोर आणलं बॉलिवूडचं काळं सत्य, म्हणाला, 'अवॉर्ड विनर असूनही १४ वर्ष...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:10 PM2023-04-04T13:10:14+5:302023-04-04T13:12:41+5:30
राजकारण, गटबाजी ज्याबद्दल प्रियांका बोलली दुर्दैवाने तीच आपल्या इंडस्ट्रीची ओळख आहे.
बॉलिवूडच्या डार्क साईडबाबत नुकतेच ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियंका चोप्राने भाष्य केले. बॉलिवूडमध्ये काही गटाकडून कशी वर्तवणूक केली जाते हे ती खुलेपणाने बोलली. प्रियंकानंतर आता 'साथिया' फेम अभिनेता विवेक ओबेरॉय यानेदेखील बॉलिवूडची पोलखोल केली आहे. जे झालं त्यातून आता मी बाहेर आलो आहे असं विवेकने यावेळी सांगितलं.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉय म्हणाला, 'मी त्या वाईट काळातून बाहेर आलो आहे याचा मला आनंद आहे. पण प्रत्येक जण इतका नशीबवान नसतो. मी अनेक गोष्टींचा सामना केला. एकप्रकारची अग्निपरिक्षाच दिली आणि त्यातून वाचलो. राजकारण, गटबाजी ज्याबद्दल प्रियांका बोलली दुर्दैवाने तीच आपल्या इंडस्ट्रीची ओळख आहे. हे बॉलिवूडचं काळं सत्य आहे आणि मी ते जवळून बघितलं आहे.'
विवेक पुढे म्हणाला,'हे फारच निराशाजनक असतं. तुम्ही सततच्या या त्रासाला कंटाळून जाता. मला याचा तेव्हा अनुभव आला जेव्हा शूट आऊट अॅट लोखंडवाला सिनेमासाठी अवॉर्ड विनिंग परफॉर्मंस देऊनही मला 14 महिन्यापर्यंत काहीच काम मिळालं नाही. ती फारच वाईट वेळ होती. तेव्हा मी हाच विचार करायचे की मला या फिल्मलाईनपेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे.' विवेकने नंतर बिझनेस आणि सामाजिक कार्यावर जास्त लक्ष दिलं.
विवेक प्रियंकाला पाठिंबा देताना म्हणाला, 'परदेशात जाऊन काम मिळवणं हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. प्रियंकाने ते करुन दाखवलं. यामुळे तिचं करिअर आज यशाच्या शिखरावर पोहोचलं आहे.'