"राणीला व्हॅनिटी व्हॅन अन् मला...", विवेक ओबेरॉयने सांगितला 'साथिया'च्या शूटिंगचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:51 IST2024-12-20T12:51:30+5:302024-12-20T12:51:50+5:30
चंदूभाई ओरडत २००० लोकांची गर्दी जमली अन् शूटिंग थांबलं...विवेक ओबेरॉयने सांगितला किस्सा

"राणीला व्हॅनिटी व्हॅन अन् मला...", विवेक ओबेरॉयने सांगितला 'साथिया'च्या शूटिंगचा किस्सा
विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) आणि राणी मुखर्जीचा (Rani Mukerji) २००२ साली आलेला 'साथिया' चांगलाच गाजला होता. विवेक-राणीची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. सिनेमातील लव्हस्टोरी खूप गाजली. हा सिनेमा आर माधवनच्या तेलुगु सिनेमाचा रिमेक होता. सिनेमाला २२ वर्ष झाली आहेत तरी सर्वांच्या मनात हा सिनेमा घर करुन आहे. नुकतंच विवेक ओबेरॉयने 'साथिया'च्या शूट दरम्यानचे काही किस्से सांगितले.
एका मुलाखतीत विवेक ओबेरॉयने 'साथिया'च्या सेटवरील अनुभव सांगितला. तो म्हणाला, "साथिया कमी बजेटमध्ये बनलेला सिनेमा होता. शूटदरम्यान राणी मुखर्जीसाठी मेकअप व्हॅन होती. मला मात्र रेस्टॉरंटच्या बाथरुममध्ये कपडे बदलावे लागायचे. मी रस्त्यावरच टचअप करायचो. मला कोणीच ओळखतंही नव्हतं. मी ट्रायपॉड खांद्यावर घेऊन बाकी क्रू सोबत चालायचो."
तो पुढे म्हणाला, "साथियासाठी मी सलग २२-२३ तास शूटिंग करायचो. बेंचवर वर्तमानपत्र ठेवून थोडी झोप घ्यायचो जेणेकरुन मी फ्रेश दिसेन. १२ एप्रिल २००२ रोजी माझा 'कंपनी' सिनेमा रिलीज झाला. त्याच रविवारी आम्ही गेटी गॅलक्सीजवळील रेल्वे चॅनलजवळ शूटिंग करत होतो. हा तोच सीन होता ज्यात मी राणीचा पाठलाग करत असतो. आम्ही नेहमीसारखंच शूटिंगला सुरुवात केली. तेव्हा राणी मुखर्जी स्टार होती. त्यामुळे तिला एक सिक्युरिटी गार्ड होता. ११-१२ वाजेच्या सुमारास अचानक आसपासच्या लोकांनी चंदू भाई ओरडायला सुरुवात केली. बघता बघता २००० लोक जमा झाले. सुरक्षाव्यवस्थाही कमी पडली. मी घाबरलो कारण एक दिवस वाया जाणार होता. शाद मला तिथून जायला सांगत होता म्हणून त्याने मला राणीच्या व्हॅनमध्ये ढकललं. मी खिडकीतुन बाहेर पाहत होतो. जमलेली गर्दी जोरजोरात डायलॉग्स बोलत होती. शेवटी पोलिस आले आणि त्यांनी मला तिथून जाण्यास सांगितलं."
नंतर शाद दरवाजा उघडून म्हणाला, 'बघ ही गर्दी तुझ्यासाठीच जमली आहे. त्यांनी मला मी एक स्टार आहे असं सांगितलं. पोलिसांनी मला त्यांच्या व्हॅनमध्ये घातलं जणू मी एखादा साधा गुन्हेगार आहे. मग आम्ही पुढच्या रविवारी पोलिस सुरक्षाव्यवस्थासह तिथेच सीन शूट केला."