'ओम शांती ओम'मध्ये व्हिलनची भूमिका का नाकारली? विवेक ओबेरॉय म्हणाला, "दोन कारणांमुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 09:32 IST2024-12-25T09:31:57+5:302024-12-25T09:32:57+5:30
विवेक ओबेरॉयने 'हम तुम', 'ओम शांती ओम' आणि 'मु्न्नाभाई एमबीबीएस' मधील भूमिका नाकारल्या आहेत.

'ओम शांती ओम'मध्ये व्हिलनची भूमिका का नाकारली? विवेक ओबेरॉय म्हणाला, "दोन कारणांमुळे..."
अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) सध्या चर्चेत आहे. जास्त सिनेमात न दिसूनही तो कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. वेगवेगळ्या बिझनेसमधून त्याची कमाई होते. 'साथिया', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला', 'ओमकारा' सारखे हिट सिनेमे देऊनही विवेक बॉलिवूडमधील गटबाजीला बळी पडला. तसंच सलमान खानशी वाद झाल्याने त्याचं करिअरच संपलं. नुकतंच एका मुलाखतीत विवेकने शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' मधील भूमिकेला नकार देण्याचं कारण सांगितलं.
विवेक ओबेरॉयने 'हम तुम', 'ओम शांती ओम' आणि 'मु्न्नाभाई एमबीबीएस' मधील भूमिका नाकारल्या आहेत. शाहरुख खानचा 'ओम शांती ओम' करण्याऐवजी त्याने 'शूटआऊट अॅट लोखंडवाला' सिनेमाला पसंती दिली. आधीच कमिटमेंट दिल्याने आणि तारखा जुळत नसल्याने नकार दिल्याचं तो सांगतो. 'मेन्स एक्सपी'ला दिलेल्या मुलाखतीत विवेक म्हणाला, "नकार देण्याचं कारण म्हणजे तारखा आपापसात क्लॅश होत होत्या. तसंच दोन्ही सिनेमात व्हिलनचीच भूमिका होती. मला शूटआऊट मधली भूमिका जास्त आवडली होती. फराह खानने मला 'ओम शांती ओम'साठी फोन केला होता. पण तोवर मी शूटआऊटमधील भूमिकेसाठी अभ्यास सुरु केला होता. मी अनेक पोलिसांना भेटलो. त्यांच्या क्राइम फाइल्स वाचल्या. भूमिकेची कल्पना करत होतो. मी त्या भूमिकेसाठी ४-५ महिने तयारी केली. त्यामुळे अचानक गियर बदलून सूट-बूट घातलेला व्हिलन बनायचं जरा कठीणच होतं."
तो पुढे म्हणाला, "जर जमत असतं, तारखा जुळल्या असत्या तर मी दोन्ही केलं असतं. फराहने खूप चांगला सिनेमा बनवला. शाहरुखसोबत काम करणं नेहमीच विशेष असतं. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये साथिया सिनेमातच मला शाहरुखसोबत काही सीन्स शूट करण्याची संधी मिळाली. खूप मजा आली होती. त्याने सिनेमात कॅमिओ केला होता."