'अक्षय कुमारचा मला फोन आला अन्..'; बॉलिवूडने टाकला होता विवेक ओबेरॉयवर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:48 PM2024-02-27T12:48:02+5:302024-02-27T13:27:10+5:30
Vivek oberoi: विवेकने त्याच्या कठीण काळावर भाष्य केलं आहे. कलाविश्वाने त्याच्यावर बहिष्कार टाकल्यानंतर त्याची अवस्था कशी झाली होती ते त्याने सांगितलं आहे.
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek oberoi) सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या फिल्मी करिअरविषयी आणि पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. या मुलाखतीमध्ये त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याविषयी भाष्य केलं होतं. त्यानंतर आता त्याने अभिनेता अक्षयकुमार याच्याविषयी एक किस्सा सांगितला आहे. करिअरच्या पडत्या काळात अक्षयकुमार कसा मदतीसाठी धावून आला होता हे त्याने सांगितलं आहे.
अलिकडेच विवेक ओबेरॉयने 'मिर्ची प्लस'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने बॉलिवूडने त्याच्यावर कसा बहिष्कार टाकला आणि त्या काळात अक्षयने कशी मदत केली हे सांगितलं.
"बॉलिवूडमधील एका विशिष्ट वर्गाकडून माझ्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. माझ्या करिअरची पूर्णपणे वाट लागली होती. याच काळात अक्षय कुमारचा मला फोन आला. तेव्हा मी त्याला सगळी परिस्थिती सांगितली. त्यावेळी मी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. आमचं बोलणं झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासात तो माझ्या घरी आला. इतक्या कमी वेळात तो माझ्या मदतीला आला हे पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं. या प्रकरणी स्वत: त्याने लक्ष घातलं आणि माझी समजूत काढली. मला वेगवेगळे उपाय सुचवले. त्या क्षणाला माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं", असं विवेक म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "माझ्या घरी आल्यावर विवेकने सगळं धीराने माझं बोलणं ऐकून घेतलं. आणि म्हणाला, सध्या माझ्याकडे अनेक शो आहेत. परंतु, बिझी शेड्युलमुळे मी ते करु शकत नाही. माझ्याकडे ज्या कामासाठी ऑफर्स येतील त्या सगळ्यांना मी तुझं नाव सांगेन. तू नक्की त्या कामांचा विचार कर, असं अक्षय म्हणाला. खरंतर आजच्या काळात एवढं कोणीच कोणासाठी करत नाही. माझे अनेक चित्रपट त्याकाळी हिट ठरले. मला पुरस्कार सुद्धा मिळाले. पण, एवढं असूनही मला काम मिळत नव्हतं. याचा मला प्रचंड मानसिक त्रास होत होता. माझ्यावर अशाप्रकारे बहिष्कार घालण्याचा काय हेतू होता? अक्षयने घरी येऊन उगाच खोटे सल्ले दिले नाहीत. त्याने व्यावहारिकपणे गोष्टी सोडवल्या. ज्यामुळे मला समाधान, पैसे आणि अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं प्रेम मिळालं."
दरम्यान, रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या सीरिजमध्ये विवेकने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत या सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, श्वेता तिवारी ही कलाकार मंडळी सुद्धा झळकली आहेत.