पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमधील विवेकचे नऊ लूक व्हायरल, साधूच्या वेशातील लूकचे काय आहे गुपित?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:11 PM2019-03-18T15:11:54+5:302019-03-18T15:15:46+5:30
मोदींच्या जीवनातील विविध टप्पे दाखवणारे नऊ लूक दाखवणारे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मोदींच्या सुरूवातीच्या काळापासून ते आतापर्यंतच्या विविध छटा या फोटोंमध्ये पाहायला मिळतायत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटातील पंतप्रधान मोदींची मध्यवर्ती भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय साकारत आहे. याच चित्रपटात विवेकने साकारलेल्या मोदींच्या जीवनातील विविध टप्प्यावरील लूक समोर आले आहेत. मोदींच्या जीवनातील विविध टप्पे दाखवणारे नऊ लूक दाखवणारे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मोदींच्या सुरूवातीच्या काळापासून ते आतापर्यंतच्या विविध छटा या फोटोंमध्ये पाहायला मिळतायत. यातील मोदींच्या प्रत्येक लूकमध्ये विवेकचा वेगळाच आत्मविश्वास दिसून येत आहे.
डोक्याला कपडा गुंडाळलेला, पगडी घातलेला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाचा लूक, साधू अवतार, दाढीमधील अवतार असे पंतप्रधान मोदींच्या जीवनातील नऊ टप्पे दाखवणारे फोटो साऱ्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. यातील दाढी वाढवलेला, गळ्यात माळा असा साधू वेशातल्या विवेकच्या फोटोची सर्वाधिक चर्चा होत आहे. मोदी ज्यावेळी हिमालयातील गुफांमध्ये गेले होते त्या काळातील लूक दाखवणारा हा विवेकचा चित्रपटातील फोटो चर्चित ठरतोय.
असं सांगितलं जातं की मोदी घर सोडून दोन वर्षांसाठी हिमालयात गेले होते. तिथे ते साधूप्रमाणे जीवन जगले होते. जीवन कसं असतं हे जाणून घेण्यासाठी मोदींनी हा मोठा निर्णय घेतला होता असं सांगण्यात येतं. आता पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात मोदींच्या जीवनातील अशाच काही माहित नसलेल्या गोष्टी पहिल्यांदाच जगासमोर येणार आहेत. मोदींच्या जीवनातील विविध लूक साकारण्यासाठी विवेक बरीच मेहनत घेत आहेत. यासाठी तो अडीच वाजताच उठतो आणि मेकअपची तयारी सुरू करतो.
जवळपास सात ते आठ तासाचा कालावधी त्याला मेकअपसाठी लागतो. त्यानंतर सकाळी ८ वाजता बरोबर तो शूटिंगसाठी सेटवर हजर असतो. प्रोस्थेटिक मेकअपमुळे शुटिंग दरम्यान विवेकला काहीच खाता येत नाही. जे काही सेवन करायचं असतं ते फक्त द्रव्यरुपातलं खाणं विवेक खाऊ शकतो. सेटवर विवेक मोदींच्या भूमिकेत इतका शिरलेला असतो की कॅमेरा ऑन नसतानाही त्याचं वागणं बोलणं, वावर सारं काही मोदीसारखंच असतं अशी माहिती मिळतेय.
विवेकचं आपल्या काम, भूमिकेवरील निष्ठा पाहून सेटवरील सारेच अवाक झाले आहेत. या चित्रपटात मोदींचा गुजरातचे मुख्यमंत्री, २०१४मधील निवडणुका ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवासही दाखवला जाणार आहे. या चित्रपटात विविध दमदार राजकीय व्यक्तीरेखा पाहायला मिळणार आहेत. अभिनेता मनोज जोशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भूमिका साकारणार आहेत. मेरी कोम आणि सरबजीत चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार पंतप्रधान मोदींवरील या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.