उपचार करणा-या डॉक्टरच्याच प्रेमात पडली होती गतकाळातील ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 06:00 AM2019-08-13T06:00:00+5:302019-08-13T10:33:56+5:30
बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे.
देवदास, नया दौर, मधुमती, गंगा जमुना, लीडर, आम्रपाली, गंवार, लीडर, सुरज, संगम, पैगाम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसह बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या अभिनेत्री वैजयंती माला यांचा आज वाढदिवस आहे.
13 ऑगस्ट 1936 रोजी मद्रास येथे एका तामिळ कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या वषीर्पासून त्यांनी भरतनाट्यमचे धडे गिरवायला सुरुवात केली होती.
वयाच्या 13 व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आणि 1951 मध्ये ‘बहार’ या सिनेमाद्वारे त्या हिंदी सिनेसृष्टीकडे वळल्या. पण त्यांना खरी ओळख दिली ती नागीन आणि देवदास या चित्रपटांनी.
1968 मध्ये वैजयंती माला यांनी डॉ. चमनलाल बाली यांच्यासह लग्न केले. हा प्रेमविवाह होता. ही प्रेमकथा कुठल्या चित्रपटापेक्षा कमी नाही. एकदा वैजयंती माला न्युमोनियाने आजारी पडल्या आणि डॉ. चमनलाल यांच्याकडे उपचारासाठी गेल्या. चमनलाल आधीच वैजयंतीमाला यांचे चाहते होते. पण वैजयंतीमाला मात्र पहिल्याच नजरेत चमनलाल यांच्या प्रेमात पडल्या. पुढे दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. पण डॉ. चमनलाल हे आधीच विवाहित होते. केवळ इतकेच नाही तर तीन मुलांचे बाप होते. साहजिकच वैजयंती माला यांच्या लग्नाला त्यांच्या आजीने (वडिलांच्या आई) कडाडून विरोध केला. मात्र आजीच्या विरोधाला झुगारुन त्यांनी डॉ. चमनलाल यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणे बंद केले. 1969 मध्ये रिलीज झालेला ‘प्रिन्स’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.
एकामागून एक हिट सिनेमे देणा-या वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये आपल्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसह काम केले आहे. दिलीप कुमार, राजकपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, सुनील दत्त या अभिनेत्यांसोबत आॅन स्क्रिन त्यांची जोडी चांगली जमली होती. वैजयंती माला यांचे सौंदर्य आणि साधेपणावर प्रत्येकजण फिदा होता. हेच कारण होते की, राज कपूर यांच्या पत्नीने राज यांना वैजयंतीमालासोबत काम करण्यास मनाई केली होती. ‘संगम’ हा राज कपूर व वैजयंतीमाला यांचा शेवटचा एकत्र असा चित्रपट. या चित्रपटानंतर दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही.