पतीने दिली होती घटस्फोटाची धमकी; वाजिद खानच्या पत्नीचा आणखी एक शॉकिंग खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 03:51 PM2020-12-20T15:51:57+5:302020-12-20T17:25:34+5:30
सुप्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे पाच महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता त्यांची पत्नी कमलरूख हिने एक शॉकिंग खुलासा केला आहे.
बॉलिवूडची सुप्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद या जोडीपैकी वाजिद खान यांचे पाच महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता त्यांची पत्नी कमलरूख हिने एक शॉकिंग खुलासा केला आहे. माझे पती माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकत होते. त्यांनी मला घटस्फोटाची धमकीही दिली होती, असे कमलरूखने म्हटले आहे.
एका ताज्या मुलाखतीत कमलरूखने दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्यावर अनेक आरोप केले. तिने सांगितले, 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मी वाजिदसोबत लग्न केले होते. मात्र 2014 साली वाजिदने माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव वाढवणे सुरु केले. मी पारसी कुटुंबातून आले होते. मला धर्मांतर मान्य नव्हते. पण मी इस्लाम धर्म स्विकारावा म्हणून वाजिदचा आग्रह होता. त्याने मला घटस्फोटाची धमकीही दिली होती. 2014 मध्ये त्याने घटस्फोटासाठी अर्जही केला होता. पण हा घटस्फोट होऊ शकला नाही. मात्र पुढे वाजिदला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला होता. त्याने माझी माफीही मागितली होती.
अलीकडे कमलरूखने वाजिदच्या कुटुंबावर म्हणजेच आपल्या सासरच्या मंडळींवर धर्मांतरासाठी दबाव टाकत छळ केल्याचा आरोप केला होता. कमलरूखने एक लांबलचक पोस्ट शेअर करत, हा खुलासा केला होता. यानंतर सगळीकडे खळबळ माजली होती.
‘ पारसी कुटुंबातून आलेली स्वातंत्र्य आणि शिक्षणाचे महत्व माहीत असलेली मी जेव्हा खान कुटुंबात आले तेव्हा मात्र परिस्थिती कमालीची बदलली. एका स्त्रीचे वेगळे विचार असू शकतात, हेच नाकारले गेले. माझ्यावर वारंवार मी इस्लाम धर्म स्विकारण्याबद्दल दबाव आणला गेला. मी नेहमीच सासरच्या सर्व रिवाजांचा आदर करत आले. पण तरीही मी इस्लाम स्विकारावा हा आग्रह धरला गेला. वारंवार छळही झाला. हे प्रकरण इतकं टोकाला पोहचले की मी आणि माझ्या पतीमध्ये घटस्फोट घडवून आणण्याच्याही गोष्टी झाल्या. पण मी हा धर्म स्विकारण्याला तयार नव्हते. आणि म्हणूनच मी त्याला शेवटपर्यंत नकार दिला,’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले होते.