मिका सिंगशी बातचीत केलेला वाजिद खानचा शेवटचा फोन कॉल व्हायरल, म्हणाला - "बस दुआओं में याद रखना..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 10:49 AM2020-06-02T10:49:12+5:302020-06-02T10:50:09+5:30
वाजितने संगीतकार मिका सिंगसोबत शेवटची बातचीत केली होती. त्यांच्या शेवटच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचा किडनी व कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान वाजितने संगीतकार मिका सिंगसोबत शेवटची बातचीत केली होती. त्यांच्या शेवटच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
ही ऑडिओ क्लिप पीपिंग मून या वेबसाईटने आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केली आहे. मिका सिंग याने वाजित यांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्याने एकत्र काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. यावर वाजित म्हणाले होते, धन्यवाद, तुझा मेसेज वाचून खूप आनंद झाला. सध्या मी तंदरुस्त होत आहे. देवाच्या कृपेने मी लवकरच ठिक होईन. तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. माझ्यासाठी प्रार्थना करा. आपण लवकरच भेटू.
वयाच्या 42 व्या वर्षी वाजिद यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून वाजिद आजारी होते. चेंबूरमधील सुराना रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी वाजिद खान यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.
1998 मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत देऊन आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर सलमान खानच्या गर्व, तेरे नाम, पार्टनर, दबंग यांसारख्या चित्रपटांची त्यांनी गाणी लिहिली, गायली आणि संगीतही दिले. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमान खानचे ‘प्यार करोना’ आणि ‘भाई भाई’ गाणेही साजिद-वाजिद जोडीने संगीतबद्ध केले होते. वाजिद यांचे ते शेवटचे गाणे ठरले.