स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायचीय!
By Admin | Published: November 3, 2016 02:23 AM2016-11-03T02:23:06+5:302016-11-03T02:23:06+5:30
‘ब्रेकअप कर लिया’ हे ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील गाण्यामुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली जोनिता गांधी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.
- वीरेंद्रकुमार जोगी
मुंबई- ‘ब्रेकअप कर लिया’ हे ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील गाण्यामुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली जोनिता गांधी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. स्वत:च्या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून बॉलिवूड ब्रेक मिळविणाऱ्या जोनिताचे अल्पावधीत यश मिळाल्यानंतरही पाय जमिनीवरच आहेत. चेन्नई एक्स्प्रेस, हायवे, ढिशूम या चित्रपटातील तिची गाणीही हीट झालीत. बॉलिवूडमध्ये मेहनत करण्याची तिची इच्छा आहे. कोणाचीही कॉपी न करता, स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा मानस असल्याचे जोनिताने ‘सीएनएक्स’शी बोलताना सांगितले...
तुझा गाण्याशी संबंध कसा आला?
- माझ्या वडिलांकडून हा वारसा मला मिळाला. ते व्यावसायिक गायक नसले, तरी चांगले गातात. यामुळे मला गाण्याची आवड निर्माण झाली. कॅनडात असताना मी वेस्टर्न क्लासिकल म्युझिक शिकले. सध्या मी हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक शिकते आहे. बॉलिवूडमध्ये शास्त्रीय संगीत आलेच पाहिजे असे नाही, पण बॉलिवूडमधील अनेक संगीतकार हिंदुस्थानी संगीताचा आधार घेऊन गाण्यांना चाली देतात. यामुळेच मी हिंदुस्थानी संगीत शिकतेय. आपल्या गाण्यात विविधता असावी हा देखील हिंदुस्तानी क्लासिकल शिकण्यामागचा एक हेतू आहे.
बॉलिवूडमध्ये तुला अचानक ब्रेक मिळाला, हे कसे घडले?
- मी कॅनडात असताना अनेक कार्यक्रमात परफॉर्म करीत होते. माझे स्वत:चे यू-ट्यूब चॅनल आहे. बॉलिवूड चित्रपटातील गाण्यांना आपल्या आवाजात गाऊन अपलोड करीत होते. मुंबईला आल्यावर बराच संघर्ष करावा लागला. एका मित्राने मला विशाल शेखर यांचा रेफरंस दिला. त्या वेळी ते ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी गायिकेच्या शोधात होते. मला हा चान्स मिळाला. यानंतर ए. आर. रहमान यांनी माझी यू-ट्यूबवरील सर्व गाणी पाहिली. मी ‘कोक स्टुडिओ’मध्येदेखील परफॉर्म केला होता. त्यांनी ‘हायवे’च्या गाण्यासाठी माझी निवड केली. मी स्वत:ला भाग्यवान समजते. यानंतर माझ्यासाठी बॉलिवूडची दरवाजे उघडे झाले.
तुझ्या मते बॉलिवूडमधील उत्कृष्ट संगीतकार - गायक कोण आहेत?
- हा थोडा कठीण प्रश्न आहे. सर्वच संगीतकार चांगले आहेत. गाणे कसे आहे यावर ते अवलंबून असते. सर्वांचे काम आपापल्या पद्धतीने चांगले आहे. गायक आणि गायिकांमध्ये मला आशा भोसले आणि अरिजित सिंग आवडतात.
गायक आणि अभिनेते यात वाद निर्माण केला जातो. अरिजित सिंगबद्दल असेच झाले, असे का होत असावे असे तुला वाटते?
- अरिजितचा वाद आता मिटला आहे, त्यामुळे त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. नो कमेंट... (थोडे थांबून) मला असे वाटते की सर्वांना मीडिया अटेंशन हवे असते. यातूनच हा वाद निर्माण करण्यात आला असावा. सध्या अरिजित इंडस्ट्रीमधील नंबर वन गायक आहे.
तुझे भविष्यातील प्लॅन काय आहेत?
- मला खूप मेहनत करायची आहे. खूप रेकॉर्डिंग करायचे आहे, खूप-खूप गायचे आहे. विशेष म्हणजे, स्वत:ची वेगळी स्टाइल निर्माण करायची आहे. सक्सेस मिळवायचे असेल तर कॉपी केलेली चालत नाही. फार कमी लोकांना हे कळते. असे लोक बॉलिवूडमध्ये तग धरू शकत नाहीत. यामुळे स्वत:ची गाण्याची स्टाईल असणे गरजेचे आहे. आपल्या गायनात विविधता असावी याकडे माझे विशेष लक्ष आहे. यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीत आहे.
तू एका इंटरव्ह्यू दरम्यान आलियासाठी गायला आवडेल असे म्हणाली होती. आताही तुला तसेच वाटते का?
- निश्चितच! आलियासाठी गायला आवडेल. ती स्वत:ही चांगली गायिका आहे. पण आपण कुणासाठी गावे हे ठरविता येत नाही. मी जॅकलिनसाठी गायले आहे, अनुष्कासाठी गायले आहे. (हसत हसत...) तुमचा प्रश्न जरा कठीण वाटतोय.
तू बँकर असती असे म्हणाली होती? आता तसा विचार करतेय का?
- नाही. आता तर अजिबात मला बँकर बनायचे नाही. गायिका म्हणूनच मला लोकांनी ओळखावे. माझे शिक्षण बँकिंग विषयात झाले आहे, त्यामुळे कदाचित मी जर गायिका झाले नसते तर बँकर झाले असते. पण आता मी बँकिंगचा विचारच करीत नाही.
तू दिवाळी कशी साजरी केलीस?
- माझे आई-वडील कॅनडात आहेत, मी इकडे मुंबईला. त्यामुळे मला
एकटीला दिवाळी साजरी करावी लागलीे. माझे वर्क कमिटमेंट पूर्ण केल्यावर मी कॅनडात जाऊन
माझ्या कुटुंबासोबत काही वेळ घालविणार आहे.