‘सेक्रेड गेम्स’पेक्षा जबरदस्त आहे ‘पाताल लोक’ ! या पाच कारणांसाठी एकदा पाहाच ही वेबसीरिज!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 03:18 PM2020-05-17T15:18:50+5:302020-05-17T15:48:59+5:30
‘पाताल लोक’मधील प्रत्येक पात्राची एक कथा आहे. ही कथा तुम्हाला खिळवून ठेवते.
अनुष्का शर्माची वेब सीरिज ‘पाताल लोक’ रिलीज झाली आणि अनुष्का पुन्हा चर्चेत आली.अनुष्काने ही वेब सीरिज प्रोड्यूस केली आहे. तिच्यासोबतच या वेब सीरिजमधील प्रत्येक कलाकारही चर्चेत आलेत. सध्या सोशल मीडियावर याच काय त्या वेबसीरिजची चर्चा आहे. अनेकांनी तर ही वेबसीरिज म्हणजे, ‘सेक्रेड गेम्स’आणि ‘मिर्झापूर’ची बाप असल्याचे म्हटले आहे़. ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज का पाहावी तर त्यातील बेस्ट कलाकारांच्या बेस्ट अभिनयासाठी...
बेस्ट स्क्रिप्ट
लेखक सुदीप शर्माची ही कथा मेंदू सुन्न करते. सुदीप यांनी या वेबसीरिजची कथा अतिशय सुंदररित्या शब्दबद्ध केली आहे आणि अविनाथ अरूण आणि प्रोसित रॉय यांनी ती तितक्यात कौशल्याने पडद्यावर जिवंत केली आहे. सीरिजमधील प्रत्येक पात्राची एक कहाणी आहे. अतिशय सहज व सुंदर पद्धतीने ती दाखवली गेली आहे. धर्म, मीडियाचे व्यावसायिकरण, पत्रकारांच्या हत्या, मोठ मोठ्या शहरातील लोकांचे आयुष्य, पोलिस यंत्रणेचे वास्तव असे एक पॅकेज आहे. सीरिजमध्ये खूप सारी हिंसक दृृश्य आहे. जे काहींना विचलित करू शकतात. पण तरीही ही एक उत्कृष्ट कथा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
कलाकार
वेबसीरिजमधील प्रत्येक पात्र, त्यांचा नैसर्गिक अभिनय बघण्यासारखा आहे. या वेबसीरिजमध्ये कुठलाही ए-लिस्ट कलाकार नाही पण सर्व कलाकरांचा तगडा अभिनय ए लिस्ट कलाकारांपेक्षा कमी नाही. जयदीप अहलावत, नीरज काबी, इश्वाक सिंग, अभिषेक बॅनर्जी यात मुख्य भूमिकेत आहेत तर स्वस्तिका मुखर्जी, गुल पनाग, विपिन शर्मा, आकाश खुराणा सपोर्टिंग रोजमध्ये आहेत. जयदीप आणि नीरज यांचा अभिनय अंगावर रोमांच आणतो. खाकीतील जयदीपची भूमिका अफलातून आहे. तर नीरज काबीने रंगवलेली न्यूज अँकर संजीव मेहराचे पात्र दमदार आहे. नीरजचा जिवंत अभिनय पाहून नजर त्याच्यावर खिळते. नीरजच्या पत्नीच्या भूमिकेत स्वस्तिकानेही तितकाच दमदार अभिनय केला आहे.
प्रत्येक पात्राची एक कथा
‘पाताल लोक’मधील प्रत्येक पात्राची एक कथा आहे. ही कथा तुम्हाला खिळवून ठेवते. पुढे काय होणार, याची उत्सुकता जिवंत ठेवते. त्यामुळेच ‘पाताल लोक’ पाहताना तुमची उत्सुकता ताणली जाते.
जयदीपचा पहिला लीड रोल
जयदीप अहलावत एक हरहुन्नरी कलाकार आहे. ‘पाताल लोक’ पाहिल्यावर हे ठळकपणे जाणवते. ‘पाताल लोक’च्या निमित्ताने त्याला पहिल्यांदा मुख्य भूमिकेत पाहणे इंटरेस्टिंग आहे.
वेगवेगळे लोकेशन्स
‘पाताल लोक’ ही वेबसीरिज दिल्ली, गुडगाव, रोहतक, चित्रकूट, अहमदाबाद, मुंबई अशा विविध ठिकाणी शूट झाली आहे. या शहरातील वेगवेगळ्या 110 लोकेशन्सवर चित्रीकरण झाले आहे. याचमुळे ही वेबसीरिज इतकी इंटेन्स व रोमांचक झाली आहे. वास्तवतेचे दर्शन यातून घडते. दिल्लीच्या एका पोलिस अधिका-याच्या घरापासून तर पोलिस स्टेशन सगळे काही अगदी वास्तववादी वाटावे यासाठी ‘पाताल लोक’च्या टीमने बराच अभ्यास केला.