"लोकांनी मला ओळखता कामा नये.."; 'छावा'ची ऑफर स्वीकारण्याआधी अक्षय खन्ना काय म्हणाला?
By देवेंद्र जाधव | Updated: March 23, 2025 13:19 IST2025-03-23T13:18:16+5:302025-03-23T13:19:28+5:30
अक्षय खन्नाने 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारण्याआधी लेखकांना आणि सिनेमाच्या टीमला काय म्हणाला? (akshaye khanna, chhaava)

"लोकांनी मला ओळखता कामा नये.."; 'छावा'ची ऑफर स्वीकारण्याआधी अक्षय खन्ना काय म्हणाला?
'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमावरुन राजकारणही बरंच पेटलं आहे. परंतु 'छावा'च्या बॉक्स ऑफिसवर मात्र कोणताच परिणाम झाला नाही. दिवसेंदिवस 'छावा'च्या कमाईचा आकडा वाढत आहे. 'छावा'मध्ये विकी कौशलने (vicky kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. याशिवाय सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत झळकलेल्या अक्षय खन्नाचंही (akshaye khanna) चांगलंच कौतुक झालं. अक्षयने 'छावा'ची ऑफर स्वीकारण्यापूर्वी सिनेमाच्या टीमला काय सांगितलं याचा खुलासा झालाय.
अक्षयने औरंगजेब साकारण्यापूर्वी काय सांगितलं?
'छावा' सिनेमाचे लेखक रिशी विरमानी यांनी अक्षय खन्नाची कास्टिंग कशी झाली याविषयी एका मुलाखतीत वक्तव्य केलं की, "छावामध्ये औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार, याविषयी चर्चा सुरु असताना अक्षय खन्ना सरांचं नाव सुचवण्यात आलं. अक्षय खन्ना यांना अनेक सिनेमांमध्ये खूप वेगळ्या भूमिका साकारताना आपण पाहिलंय. त्यामुळे अक्षय खन्ना यांनी ही भूमिका साकारली तर काहीतरी वेगळा परिणाम घडेल. त्यामुळे आम्ही त्यांना भेटायचं ठरवलं. सरांना भेटल्यावर त्यांना सिनेमाची स्क्रीप्ट आवडली आणि ते छावामध्ये काम करायला तयार झाले. ते खूप उत्सुक होते."
"अक्षय खन्ना खूप जबरदस्त अभिनेते आहेत. त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय. आम्हाला त्यांना सिनेमात कास्ट करुन खूप आनंद झाला. अक्षय खन्ना यांना भेटून ते आम्हाला म्हणाले की, लोकांनी मला ओळखावं ही माझी इच्छा नाही. औरंगजेब हा औरंगजेबच वाटला पाहिजे. हे ऐकूनच आम्हाला जाणवलं की ते या व्यक्तिरेखेचा किती सखोल अभ्यास करत आहेत. त्यामुळे औरंगजेबाच्या भूमिकेसाठी आमची निवड योग्य आहे, ही खात्री पटली. अक्षय यांनी विलक्षण पद्धतीने ही भूमिका साकारली आहे." असा खुलासा लेखकांनी केला.