जो दिखता है, वही बिकता है ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2016 07:28 AM2016-08-08T07:28:51+5:302016-08-08T16:24:38+5:30

बॉलीवुडचे सिनेमा कोटीची कोटी उड्डाणे करतायत. सिनेमांनी शंभर कोटी, दोनशे कोटी, तीनशे कोटी कमाई करत बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड ...

What does it look like is sold? | जो दिखता है, वही बिकता है ?

जो दिखता है, वही बिकता है ?

googlenewsNext
ong>बॉलीवुडचे सिनेमा कोटीची कोटी उड्डाणे करतायत. सिनेमांनी शंभर कोटी, दोनशे कोटी, तीनशे कोटी कमाई करत बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढल्याचं पाहायला मिळतं. मात्र या रेकॉर्डब्रेक सिनेमांच्या यादीत सर्वाधिक भरणा हा बॉलीवुडच्या हिट चेह-याच्या कलाकारांच्या सिनेमांचा असल्याचं आजवर पाहायला मिळालंय. बॉलीवुडवर अधिराज्य गाजवणा-या काही प्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शक किंवा विशिष्ट बॅनरचे सिनेमाच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करत असल्याचं चित्र आहे. इतर कलाकारांच्या सिनेमांची कथा कितीही चांगली आणि दर्जेदार असली तरी त्याला म्हणावं तसं यश मिळत नसल्याचं बॉलीवुडमध्ये पाहायला मिळतं.

बॉलीवुडवर अधिराज्य गाजवणारे त्रयी म्हणजे खानदान म्हणजेच सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान. गेल्या अनेक वर्षांपासून या तिन्ही खानांनी रसिकांच्या मनावर अशी काही मोहिनी घातलीय की त्यांचे सिनेमा पाहण्यासाठी रसिक अक्षरक्षा वेडे होतात. शाहरुख खाननं तर रसिकांवर अशी काही जादू केलीय की त्याला बॉलीवुडचा किंग, रोमान्सचा बादशाह अशी बिरुदावली दिली गेलीय. 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है' पासून ते आजच्या 'चेन्नई एक्सप्रेस', 'फॅन' असे एकाहून एक सिनेमा केवळ शाहरुखच्या नावावर हिट ठरलेत. आपल्या लाडक्या शाहरुखला पाहण्यासाठी रसिक थिएटरकडे आकर्षित होतात आणि त्याच्या सिनेमाला तिकीटखिडकीवर कोटीच्या कोटींचा गल्ला मिळवून देतात.

अशीच काहीशी जादू दबंग सलमान खानचीही आहे. गेल्या काही वर्षांपासून सलमान खाननं तर ईदच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज करण्याचा धडाका लावलाय. त्यामुळं त्याचे फॅन्सही ईदप्रमाणेच सलमानच्या सिनेमाचीही आतुरतेने वाट बघत असतात. सलमानचा कोणताही सिनेमा असो, त्याची कथा काहीही असो भाईजान सिनेमात आहे म्हटलं की त्याच्या फॅन्सची पावलं आपसुकच सिनेमागृहाकडे वळतात. सलमानच्या 'दबंग', 'दबंग-2', 'एक था टायगर', 'बॉडीगार्ड', 'बजरंगी भाईजान', 'सुल्तान' अशा सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे केलीत.

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचे सिनेमाही फक्त त्याच्या नावावर बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत असल्याचं पाहायला मिळालंय.आमिर खान वर्षातून एक सिनेमा करतो, त्यामुळं त्याच्या सिनेमाची चाहत्यांना बरीच उत्सुकता असते. आमिरच्या सिनेमात काही तरी वेगळं असणार यामुळं रसिकसुद्धा त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहतो. आमिरच्या गेल्या काही वर्षातल्या सिनेमांनी हेच सिद्ध केलंय. 'रंग दे बसंती', 'थ्री इडियट्स', 'तारें जमी पर', 'गजनी', 'धूम-3', 'पीके' अशा आमिरच्या सिनेमांना रसिकांनी अक्षरक्षा डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळालं.

बॅालीवुडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा उत्साहसुद्धा तरुण अभिनेत्यांना लाजवेल असाच असतो. बिग बींची रसिकांवरील जादू आजही कायम आहे. त्यामुळं बिग बींचे सिनेमा पाहण्यासाठी रसिकांमध्ये क्रेझ असते. बिग बींच्या सिनेमांनाही बॉलीवुडमध्ये कोटीच्या घरात यश मिळालंय. बॉलीवुडचा पहिला सुपरहिरो हृतिक रोशनच्या सिनेमांनाही रसिकांनी असंच काहीसं डोक्यावर घेतलंय.

ही तर झाली बॉक्स ऑफिसवर प्रसिद्ध चेह-यांना मिळणा-या भरघोस प्रतिसादाची एक बाजू. त्याच वेळी बॉलीवुडमध्ये असेही काही कलाकार आहेत ज्यांच्या सिनेमांची कथा दर्जेदार असते, त्यांचा अभिनयसुद्धा तितकाच सरस असतो. मात्र तिकीट खिडकीवर या सिनेमांना म्हणावं तसं यश काही मिळत नाही. शाहरुख, सलमान, आमिर, बिग बीं यांच्या सारख्या दिग्गजांच्या सिनेमांना मिळणा-या यशाप्रमाणे या कलाकारांच्या सिनेमांना यश मिळत नाही. यांत खिलाडी अक्षय कुमारच्या सिनेमाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अक्षयच्या सिनेमांची कथा चांगली असली तरी अपवादानं त्याच्या सिनेमांनं शंभर कोटी, दोनशे कोटींची कमाई केल्याचं पाहायला मिळतं. गेल्या काही वर्षात अक्षयचे 'रावडी राठोड', 'ब्रदर्स', 'एअरलिफ्ट,' 'बेबी', 'हाऊसफुल्ल-3' असे सिनेमा रुपेरी पडद्यावर आले. ते सिनेमा चाललेसुद्धा मात्र त्यांना बड्या स्टार्सच्या सिनेमांप्रमाणे तिकीटखिडकीवर यश मिळालं नाही. अशीच काहीशी परिस्थिती अजय देवगण, इरफान खान, नवाजुद्दीन शेख, रणवीर सिंह यांच्या सिनेमांच्या बाबतीही म्हणता येईल.

अभिनेत्रींबाबतही असंच काहीसं चित्र आहे. बॉलीवुडमध्ये सध्या प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ या अभिनेत्रींची चलती आहे. या अभिनेत्रींचे सिनेमा पाहण्यासाठी रसिक अक्षरक्षा वेडे होतात. त्यांच्या अभिनयाने नटलेले सिनेमा तिकीट खिडकीवर कोटीच्या कोट्टी उड्डाणे करतात.

हे तर झालं प्रसिद्ध कलाकारांना मिळणा-या प्रतिसादाबाबत. मात्र बॉलीवुडचे सिनेमा त्या त्या दिग्दर्शक किंवा बॅनरच्या नावावरही तुफान हिट ठरतात. बॉलीवुडमध्ये गेल्या काही वर्षांपासून करण जोहर, रोहित शेट्टी, राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साली या दिग्दर्शकांचं वर्चस्व पाहायला मिळतंय.या दिग्दर्शकांच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कोटींच्या घरात कमाई केलीय. बॉलीवुडच्या बॅनरचीसुद्धा तीच गत आहे. यशराज बॅनर, धर्मा प्रॉडक्शन्स, इरॉस, रेड चिलीज एंटरटेन्मेंट अशा बड्या बॅनरच्या सिनेमांना तुफान यश मिळतं.या दिग्दर्शकांच्या किंवा बड्या बॅनरच्या सिनेमांची कथा कितीही सुमार असली तरी त्या सिनेमांना त्यांच्या नावाच्या आधारे तिकीटखिडकीवर तुफान यश मिळतं. त्यामुळं बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध चेहरे, प्रसिद्ध दिग्दर्शक, प्रसिद्ध बॅनर हाच तिकीट खिडकीवरील सक्सेस फॉर्मुला आहे का अशी शंका उपस्थित होते.




दिग्दर्शक संजय जाधवचं यावर काहीसं वेगळं मत आहे. सलमान, शाहरुख किंवा मग आमिर हे स्टार बनण्याआधी एक कलाकारच होते. या कलाकारांनी आपल्या अभिनयानं रसिकांचा विश्वास संपादन केलाय. रसिकांचं मनोरंजन करुन ते स्टारपदापर्यंत पोहचलेत. या कलाकारांचे सिनेमा सुपरहिट ठरतात कारण रसिकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास.या विश्वासापोटीच या तिन्ही खानांचे सिनेमा कथा नसले तरी चालतात असं संजय जाधवला यांना वाटतं.




दिग्दर्शिका समृद्धी पोरे -  सध्या नायकप्रधान सिनेमा चालतात. रसिकांना सध्या बौद्धिक मनोरंजनापेक्षा कमरेखालील विनोद बघायला आवडतात. मात्र या गोष्टीचा फटका चांगला सिनेमा, कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना बसतो. या खानचा सिनेमा ईदला, याचा दिवाळीला, तिस-या खानचा ख्रिसमसला हे रसिकांच्या मनात अगदी फिट्ट केलं जातं.भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करणारा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा त्यातल्या त्यात चांगला होता. असे समाजात चांगले संदेश देणारे किंवा प्रबोधनात्मक सिनेमा यावेत आणि चालावेत असं वाटतं.


 
दिग्दर्शक सुजय डहाके - सलमान, शाहरुख यांना त्याच त्या अंदाजात रसिकांना बघायला आवडतं. त्यांनी रुपेरी पडद्यावर काहीही केलेलं रसिकांना भावतं. मात्र त्यांनी काही वेगळं केलं की ते त्यांच्या फॅन्सना कदाचित अावडत नसाव. उदाहरणार्थ शाहरुखचा 'फॅन' सिनेमा. यांत त्यानं वेगळं करण्याचा प्रयत्न केला, मात्र रसिकांनी ते साफ नाकारलं. त्यामुळं हे दोन्ही स्टारसुद्धा त्यांच्या रसिकांना जे आवडतं तेच करतात. यांत चित्रपटसृष्टीचा दोष नसून रसिकांची मानसिकता तशी झालीय. रसिकांना आमिर आवडतो कारण दरवेळी त्याच्या भूमिकांमध्ये नाविन्य असतं.
 
 

 

Web Title: What does it look like is sold?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.