अनिल कपूर काय म्हणाले सोनम व हर्षवर्धनच्या पदार्पणाबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 01:15 PM2018-07-27T13:15:08+5:302018-07-27T13:17:38+5:30
सोनम व हर्षवर्धन वशिलेबाजीमुळे सिनेइंडस्ट्रीत आली नसल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले.
अभिनेता अनिल कपूर यांची दोन मुले अभिनेत्री सोनम व अभिनेता हर्षवर्धन यांना बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांनी लाँच केले आहे. निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरियाँ’ चित्रपटातून सोनमने पदार्पण केले तर राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’ चित्रपटातून हर्षवर्धनने पदार्पण केले. मात्र आपली मुले वशिलेबाजीमुळे सिनेइंडस्ट्रीत आली नसल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले आहे.
अनिल कपूर म्हणाले की, ‘संजय लीला भन्साळी काही माझ्या घरी जेवण बनवायला येत नाहीत. सोनमने ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात भूमिका साकारल्यावर राकेश मेहरा यांनीही हर्षवर्धनला आपल्या पुढच्या चित्रपटात घेण्याचे वचन मला दिले नव्हते. त्यांच्यासारखे दिग्दर्शक अत्यंत व्यावसायिक असतात आणि ते तसेच वागतात. जेव्हा सोनमचा पहिला चित्रपट ‘सावरियां’ आणि त्यानंतर ‘दिल्ली 6’ प्रदर्शित झाला होता आणि हे चित्रपट अयशस्वी ठरले होते. त्यावेळी लोकांनी मला सोनमच्या करियरबद्दल बरेच विचारले होते. मलाही चार वेळा अपयश सहन करावे लागले आहे. त्यावेळी माझ्याकडेदेखील काम नव्हते. ’
सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूर या आपल्या दोन्ही मुलांना मोठमोठ्या दिग्दर्शकांकडून काम वशिलेबाजीमुळे नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्यातील टॅलेंट असल्यानेच मिळतात. आपल्या चित्रपटाच्या यशाबाबत आणि साहजिकच बॉक्स ऑफीसवर मिळणाऱ्या नफ्याबाबत ते फार जागरुक असतात, असेही अनिल कपूरने सांगितले व पुढे म्हणाले की, ‘आजच्या काळात कोणत्याच निर्मात्याला कोट्यवधी रुपये वाया घालवणे परवडणार नाही. चित्रपट तयार करणे ही अत्यंत महागडी गोष्ट आहे. जर त्यांना कलाकारांवर विश्वासच नसेल, तर ते एक दमडीही त्यांच्यावर खर्च करणार नाहीत. वडील म्हणून मला माझ्या मुलांची काळजी आहेच. पण माझ्या सहभागाशिवाय निर्माते आणि दिग्दर्शक त्यांची कास्टिंग करतात.’