जे होईल ते होईल...! घराबाहेरील गोळीबारावर सलमान खानची रिअॅक्शन; सलीम यांचा घर सोडण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 16:39 IST2024-04-14T16:38:44+5:302024-04-14T16:39:39+5:30
Salman Khan Home Firing news: बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान ज्या इमारतीमध्ये राहतो त्या इमारतीबाहेर आज पहाटे गोळीबार झाला आहे. बिश्नोई गँगने हा शेवटचा इशारा असे म्हणत गोळीबार केला आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानशी फोनवर चर्चा केली आहे.

जे होईल ते होईल...! घराबाहेरील गोळीबारावर सलमान खानची रिअॅक्शन; सलीम यांचा घर सोडण्याचा सल्ला
बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान ज्या इमारतीमध्ये राहतो त्या इमारतीबाहेर आज पहाटे गोळीबार झाला आहे. बिश्नोई गँगने हा शेवटचा इशारा असे म्हणत गोळीबार केला आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानशी फोनवर चर्चा केली आहे. या गोळीबारावर सलमान खानने काय प्रतिक्रिया दिली आहे, हे त्यांच्या जवळच्या एका मित्राने सांगितले आहे.
झूम टीव्हीने सलमानच्या एका मित्राशी यावर संवाद साधला. यामध्ये त्याने सलमानच्या घरातील वातावरणावर भाष्य केले आहे. सलमान खानला त्याच्या जिवाची चिंता नाहीय. मात्र, यामुळे त्याच्या कुटुंबावर जो परिणाम झाला आहे त्याची त्याला चिंता आहे, असे या मित्राने म्हटले.
सलमानच्या वडिलांनी कुटुंबीयांना सांगितलेय की, सर्वांनी घरापासून वेगळे होऊन दुसरीकडे कुठेतरी रहावे. तर सलमानला असे वाटतेय की या घटनेला ते जेवढे महत्व देतील तेवढे गोळीबार करणाऱ्यांना वाटेल की ते खूप यशस्वी झाले आहेत. सलमानने सर्व काही नशीबावर सोडले आहे, जे होईल ते होईल, असे या मित्राने सांगितले आहे.
दरम्यान, सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली असून या गोळीबाराचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये दोघेजण बाईकवरून आले होते. त्यांनी हेल्मेट घातले होते. मुंबई पोलिसांनी सांगितल्यानुसार त्यांनी तीन गोळ्या झाडल्या.