अभिषेकचा ‘कारनामा’ पाहून रागाने लालबुंद झाली होती ऐश्वर्या, दोन रात्री ठेवलेलं खोली बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 02:13 PM2021-08-19T14:13:20+5:302021-08-19T14:16:05+5:30
होय, ऐश्वर्यानं दोन रात्री अभिषेकला खोलीबाहेर ठेवलं होतं. खुद्द अभिषेकनं एका जुन्या मुलाखतीत या भांडणाबद्दल सांगितलं होतं.
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya Rai) हे बॉलिवूडच्या आदर्श जोडप्यांपैकी एक जोडपं. या जोडप्यातंही सर्वसामान्य जोडप्यात होतात तशी भांडणं होत असावीत का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असंच देता येईल. दोघांमध्ये फार मोठी भांडणं झाल्याच्या बातम्या फार कधी कानावर आल्या नाहीत. पण हो, एकदा दोघांमध्ये असं काही भांडण झालं होतं की, ऐश्वर्यानं दोन रात्री अभिषेकला खोलीबाहेर ठेवलं होतं. होय तर, खुद्द अभिषेकनं एका जुन्या मुलाखतीत या भांडणाबद्दल सांगितलं होतं. या भांडणाचं कारण जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर तुम्हाला पुढचा किस्सा वाचायला लागेल.
तर हा किस्सा आहे 2014 सालचा. अभिषेकनं प्रो-कबड्डी लीग जिंकली होती. यादरम्यान अभिषेक आपल्या टीमसोबत ट्रेनिंगच्या निमित्तानं चेन्नईच्या सत्यभामा युनिव्हर्सिटीत गेला होता. यावेळी त्याची भेट युनिव्हर्सिटीचे संस्थापक कर्नल जेपीआर यांच्याशी झाली. जेपीआर यांचे कार्यालय अगदीच लहान होते. त्यांच्या ट्रॉफी कार्यालयाच्या जमिनीवर सर्वत्र सजवून ठेवलेल्या होत्या. जमिनीवर ट्रॉफी पाहून अभिषेकला कुतूहल वाटले. त्यानं जेपीआरला याबद्दल विचारलं. त्याच्या डोळ्यातील कुतूहल पाहून आधी तर कर्नल हसले आणि मग त्यांनी असं करण्यामागचं कारण सांगितलं. मी जाणीवपूर्वक पुरस्कार जमिनीवर ठेवले. कारण पुरस्कारांना कधीच डोक्यावर चढू द्यायचं नसतं, असे ते म्हणाले. त्यांच्या या उत्तराने अभिषेक चांगलाच प्रभावित झाला.
घरी गेल्यानंतर अभिषेकनं सर्वप्रथम काय करावं तर त्याला व ऐश्वर्याला मिळालेले सर्व पुरस्कार शोकेसमधून काढून जमिनीवर सजवले. आपण काहीतरी महान काम केल्याचं समाधान त्याच्या डोळ्यांत होतं. पण त्याचवेळी ऐश्वर्या खोलीत आली आणि जमिनीवर सर्वत्र सजवलेले पुरस्कार पाहून तिचं माथं ठणकलं. अभिषेकनं तिला कारण समजवण्याचा प्रयत्न केला. पण ऐश्वर्याचा राग अनावर झाला होता. इतका की, तिनं अभिषेकला थेट खोलीबाहेर काढलं. यानंतर काय तर दोन रात्र अभिषेकला खोलीबाहेर काढाव्या लागल्या होत्या. अर्थात दोन दिवसानंतर तिचा राग निवळला आणि सर्व काही ऑल वेल झालं...