...अन् ईशा देओलने पती भरत तख्तानीच्या कानशिलात लगावली; नेमकं काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:05 PM2024-02-07T12:05:43+5:302024-02-07T12:06:16+5:30
Esha Deol Divorce : लग्नाआधी ईशाने भरतच्या कानाखाली का मारलं होतं? जाणून घ्या किस्सा
बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लेकीचा १२ वर्षांचा संसार मोडला आहे. ईशा आणि भरतने परस्पर संमतीने निर्णय घेत घटस्फोट घेतल्याचं सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून ईशा आणि भरत यांच्यात बिनसल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी घटस्फोट घेत वेगळं झाल्याचा खुलासा केला.
ईशा आणि भरत यांची पहिली भेट शाळेच्या एका स्पर्धेदरम्यान झाली होती. पहिल्या नजरेतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. टिश्यू पेपरवर ईशाने भरतला तिचा फोन नंबर लिहून दिला होता. त्यानंतर ते फोनवरच बोलू लागले होते. त्या दोघांची क्वचितच भेट व्हायची. पण, असंच एकदा भेटल्यानंतर ईशाने भरतच्या कानशिलात लगावली होती. ईशा आणि भरत एकमेकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी भरतने ईशाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला होता. ईशाला भरतचं हे वागणं खटकल्यामुळे तिने त्याच्या कानशिलात लगावली होती.
"माझी हात पकडण्याची तुझी हिंमत कशी झाली?" असं ती भरतला म्हणाली होती. त्यानंतर दोघांनीही बोलणं बंद केलं होतं. जवळपास १० वर्ष ते एकमेकांशी बोलत नव्हते. त्यानंतर पुन्हा ते नायगरा फॉल्सजवळ भेटले होते. तेव्हा भरतने ईशाला "मी तुझा हात पकडू शकतो का?" असं विचारलं होतं. त्यानंतर ईशा आणि भरतच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. काही वर्ष डेट केल्यानंतर २०१२ साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता १२ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत. त्यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत.