नसिरुद्दीन शाह यांच्या पाठीत मित्राने चाकू खुपसला आणि...; ओम पुरींमुळे वाचलेले अभिनेत्याचे प्राण, नेमकं काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 01:54 PM2023-10-07T13:54:32+5:302023-10-07T13:55:09+5:30
नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्या जीवनावर आधारित 'अँड देन वन डे' या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकातच त्यांनी त्यांच्या जीवनातील एक भयानक प्रसंग सांगितला आहे.
नसिरुद्दीन शाह हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. गेल्या चार दशकांपासून ते प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्या जीवनावर आधारित 'अँड देन वन डे' या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकातच त्यांनी त्यांच्या जीवनातील एक भयानक प्रसंग सांगितला आहे.
१९७७ साली एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नसिरुद्दीन शाह ओम पुरी यांच्यासह डिनरसाठी गेले होते. त्यावेळी नसिरुद्दीन शाह आणि त्यांचा मित्र जसपालमध्ये मतभेद झाले होते. नसिरुद्दीन शाह ज्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते तिथेच त्यांचा मित्रही उपस्थित होता. तो त्यांच्याकडेच पाहत होता. त्यांच्या पाठीमागच्याच टेबलवर ते बसले होते. नसिरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांनी जसपालकडे दुर्लक्ष केलं होतं. पण, त्यानंतर काहीच वेळात जसपालने नसिरुद्दीन शाहांच्या पाठीत चाकू खुपसला. तो पुन्हा वार करणार इतक्यात ओम पुरी आणि इतर लोकांनी त्याला पकडलं.
त्यानंतर हॉटेलमध्ये पोलिसांना बोलवल्यानंतर ओम पुरी नसिरुद्दीन शाह यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. जुहू येथील कूपर हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. नसिरुद्दीन शाह या हल्ल्यात जखमी झाले होते. पण, ओम पुरी यांच्यामुळे या हल्ल्यातून त्यांचे प्राण वाचले. आपल्या पुस्तकात त्यांनी हा प्रसंग सांगितला आहे.