'या' एका कारणामुळे कमल हासनला पडला त्याच्या स्टारडमचा विसर; चक्क राजेश खन्नाचा बॉडीगार्ड म्हणून केलं काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:00 AM2022-07-27T08:00:00+5:302022-07-27T08:00:00+5:30
Kamal haasan: दिवंगत अभिनेता राजेश खन्ना आणि कमल हासन यांची घनिष्ट मैत्री होती. त्यामुळे वरचेवर हे दोघं एकमेकांना भेटायचे. यात बऱ्याचदा राजेश खन्ना चेन्नईला येत.
साऊथ आणि बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार म्हणजे कमल हासन (kamal hassan) अन् राजेश खन्ना (rajesh khanna). दोन्ही कलाकारांनी कलाविश्वात त्यांचं अढळ स्थान निर्माण केलं. त्यामुळे १९८० पासून ते आजपर्यंतचा काळ गाजवणारे लोकप्रिय कलाकार म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे पडद्यावर झळकणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांचे चांगले मित्र होते. या दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्सेदेखील आहेत. यात एकेकाळी कमल हासन यांनी चक्क राजेश खन्ना यांच्या बॉडीगार्डचं काम केलं होतं.
दिवंगत अभिनेता राजेश खन्ना आणि कमल हासन यांची घनिष्ट मैत्री होती. त्यामुळे वरचेवर हे दोघं एकमेकांना भेटायचे. यात बऱ्याचदा राजेश खन्ना चेन्नईला येत. याच काळात एक चित्रपटगृहाबाहेर कमल हासन यांना चक्क राजेश खन्ना यांचं बॉडीगार्ड व्हावं लागलं होतं. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं होतं.
"आम्ही दोघं चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याविषयी खूप चर्चा करायचो. एकदा आम्ही दोघं 'द स्वार्म' हा अमेरिकन चित्रपट पाहायला गेलो. परंतु, आम्ही ज्या ठिकाणी जातोय ते थिएटर पब्लिक आहे हे राजेश खन्नाला माहित नव्हतं. आणि, यापूर्वी ते कधीच पब्लिक स्क्रिनिंगच्या ठिकाणी चित्रपट पाहायला गेले नव्हते. या थिएटरमध्ये आम्ही दोघांनीही संपूर्ण चित्रपट पाहिला. त्यावेळी, जर लोकांना समजलं की इथे राजेश खन्ना आहे तर एकच गोंधळ उडेल असं मी त्यांना सांगितलं होतं. पण, ते ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सगळा चित्रपट पाहायला अट्टाहास केला", असं कमल हासन म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "चित्रपट संपल्यानंतर आम्ही बाहेर पडायला निघालो आणि लोकांनी राजेश खन्ना यांना ओळखलं. बास्स..झालं..लोकांनी त्यांना घेरायला सुरुवात केली. अखेर मला त्यांचं बॉडीगार्ड व्हावं लागलं. मी कसंबसं त्यांना गर्दीतून बाहेर काढलं. मात्र, या सगळ्यात त्यांचा शर्ट फाटला होता. पण, हा क्षणदेखील त्यांनी मनापासून एन्जॉय केला. त्यांचं वागणं अगदी एका निरागस लहान मुलांसारखं होतं."
दरम्यान, कमल हासन आणि राजेश खन्ना यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. मात्र, त्यातील हा किस्सा बराच फेमस आहे. कमल हासन यांनी दाक्षिणात्य कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केल्यामुळे त्यांना साऊथमधील देव असंही म्हटलं जातं. तर, राजेश खन्ना यांनी काका या नावाने ओळखलं जायचं.