लुधियानातील शेतकऱ्यांचे नशीब फळफळले!, जाणून घ्या 'भारत'च्या सेटवर काय घडले एका रात्रीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 07:25 PM2019-01-30T19:25:34+5:302019-01-30T19:27:06+5:30
सलमानच्या भारत चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील एका सीनमुळे लुधियानातील शेतकरी एका रात्रीत लखपती झाले आहेत.
सलमानच्या भारत चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील एका सीनमुळे लुधियानातील शेतकरी एका रात्रीत लखपती झाले आहेत. हा सिनेमा भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आहे. मात्र फाळणीच्या काळातील काही दृश्यांच्या शुटिंगसाठी निर्मात्यांनी एक शक्कल लढवली. त्यामुळे लुधियानातील शेतकऱ्यांचा खूप फायदा झाला आहे.
काही महत्वाच्या सीनसाठी भारतच्या टीमला वाघा बॉर्डरवर चित्रीकरण करायचे होते. मात्र सुरक्षेच्या कारणासाठी बीएसएफने सीमेवरील शुटिंग करण्याला परवानगी नाकारली. म्हणून भारतच्या टीमने लुधियानातील बल्लोवाल गावातच वाघा बॉर्डरचा सेट उभारला. या सेटसाठी गावातील काही शेतजमीन काही दिवसांसाठी भाड्याने घेतली होती. एकूण १९ एकर जमीन शेतकऱ्यांकडून घेतली गेली. यातील एका एकरासाठी शेतकऱ्यांना ८० हजार रुपयांचे भाडे दिले गेले. याच भाड्यामुळे लुधियानातील शेतकऱ्यांना एकूण १५ लाख रुपये मिळाले आणि ते रातोरात लखपती झाले. भारतचे डायरेक्शन अली अब्बास जाफर करत आहेत.
‘भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़ यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़ म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़ प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला कॅटरिना व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.