किस्सा: 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकासाठी नाना पाटेकरांनी स्वत:चं घर ठेवलं होतं गहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 05:15 PM2022-01-03T17:15:00+5:302022-01-03T17:15:00+5:30
Nana patekar: अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणूनही ओळखला जातो.
खडा आवाज, संवादफेक कौशल आणि अभिनयाचा दांडगा अनुभव असलेला दिग्गज कलाकार म्हणजे नाना पाटेकर (nana patekar) . मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचं खणखणीत नाणं नानांनी वाजवलं. त्यामुळे आज कलाविश्वात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. विशेष म्हणजे अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणूनही ओळखला जातो. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या असाच एक किस्सा चर्चिला जात आहे. यात एका प्रसिद्ध दिग्दर्शकासाठी त्यांनी त्यांचं राहतं घर गहण ठेवलं होतं.
नाना पाटेकर यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. अशोक सराफ( ashok saraf), शाहरुख खान (shahrukh khan) यांनीदेखील अनेकदा नाना पाटेकर यांच्या मैत्रीचे किस्से, त्यांच्या उदारपणाचे शेअर केले आहेत. परंतु,यावेळी नाना एका दिग्दर्शकामुळे चर्चेत आले आहेत. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक असं नाव कमावणाऱ्या एका प्रसिद्ध व्यक्तीसाठी नाना पाटेकरांनी त्यांचं घर गहाण ठेवलं होतं.
बॉलिवूडला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे एन. चंद्रा यांच्यासाठी नाना पाटेकरांनी त्यांचं घर गहाण ठेवलं होतं. नाना पाटेकर आणि एन. चंद्रा यांनी जवळपास अनेक चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं.त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री होती. याच मैत्रीखातर नाना पाटेकरांनी इतका मोठा निर्णय घेतला होता.
एकेकाळी एन. चंद्रा यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यामुळे त्या काळात त्यांना पैशाची अत्यंत गरज होती. परंतु, बॉलिवूडमधील कोणताही कलाकार त्यांच्या मदतीसाठी पुढे आला नाही. अशा वेळी नाना पाटेकर त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते. एन. चंद्रा (N.chandra) यांना जी रक्कम अपेक्षित होती तितकी नानांकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या घराचे कागदपत्र काढले आणि ते गहाण ठेवले. यातून जे पैसे आले ते एन. चंद्रा यांना दिले.
दरम्यान, नाना पाटेकरांमुळे एन. चंद्रा यांच्यावरील मोठं संकट टळलं होतं. त्यामुळे पुढे जाऊन एन. चंद्रा यांनी नाना पाटेकरांना त्यांची सगळी रक्कम परत केली. इतकंच नाही तर त्यांना एक स्कूटरदेखील भेट म्हणून दिली.