मी कोण? जा तुझ्या अब्बाला विचारून ये! या कारणामुळे सलमानवर भडकले होते राजकुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 07:13 PM2021-05-28T19:13:13+5:302021-05-28T19:26:30+5:30
अगदी कडक शिस्तीचे आणि फटकळ स्वभावाचे म्हणून राजकुमार ओळखले जात. त्यांच्या या स्वभावाचे अनेक किस्से बॉलिवूडमध्ये आजही ऐकवले जातात.
बॉलिवूडमध्ये ‘जानी’ हा शब्द कानावर पडताच अशा अभिनेत्याची छबी समोर येते ज्याचा आवाज आणि अभिनयाचे सगळेच ‘दिवाने’ होते. आम्ही बोलतोय ते अभिनेते राजकुमार ( Rajkumar ) यांच्याबद्दल़ राजकुमार यांनी बॉलिवूडमध्ये जवळपास ६० चित्रपटांमध्ये काम केले. या प्रत्येक चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. राजकुमार या नावाचाच त्याकाळी रूबाब होता. पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांचा एक वेगळाच रूबाब होता.
अगदी कडक शिस्तीचे आणि फटकळ स्वभावाचे म्हणून राजकुमार ओळखले जात. त्यांच्या या स्वभावाचे अनेक किस्से बॉलिवूडमध्ये आजही ऐकवले जातात. असाच एक किस्सा 40 वर्षांपूर्वी घडला होता. तो सुद्धा आजचा भाईजान सलमान खानसोबत.
तर किस्सा आहे 1989 सालचा. सलमान (SalmanKhan) नवा नवा बॉलिवूडमध्ये आला होता आणि त्याचा सिनेमा ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Piya )सुपरडुपर हिट झाला होता. या चित्रपटाची एक सक्सेस पार्टी आयोजित केली गेली होती.
दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी राजकुमार यांनाही या पार्टीचे निमंत्रण दिले होते. राजकुमार पार्टीला पोहोचले़ पार्टी सुरू असतानाच, मला ‘मैंने प्यार किया’च्या सर्व कलाकारांना भेटायचे आहे, असे ते सुरज बडजात्या यांना म्हणाले. सुरज बडजात्या मोठ्या आदराने त्यांना सलमान खानला भेटायला घेऊन गेलेत आणि राजकुमार सलमानपुढे जाऊन अचानक उभे झालेत. सलमान याआधी कधीच राजकुमार यांना भेटला नव्हता त्यामुळे आप कौन? असा प्रश्न त्याने केला. मग काय? सलमानचा तो प्रश्न ऐकून राजकुमार भडकले. त्यांचा पारा अचानक चढला.
अशात सलमानला उत्तर देत ते म्हणाले, बेटा, जाओ अपने अब्बा से पुछकर आओ की हम कौन है?
राजकुमार यांचे हे वाक्य ऐकून सुरज बडजात्या समजायचे ते समजले आणि त्यांनी मध्यस्थी करून सलमानला राजकुमार यांची ओळख करून दिली. या घटनेनंतर सलमानला राजकुमार कुठेही दिसले की तो सर्वप्रथम त्यांना जाऊन भेटायचा.
राजकुमार यांनी बॉलिवूडमध्ये जवळपास 60 चित्रपटांमध्ये काम केले. या प्रत्येक चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 1952 मध्ये आलेल्या ‘रंगिली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणा-या राजकुमार यांनी ‘आबशार’, ‘घमंड’ आणि ‘लाखों में एक’ यांसारख्या चित्रपटांत दमदार अभिनय करून आपली छाप सोडली.