सोनाक्षी सिन्हा माझ्यासारखी दिसत नाही...! ‘ती’ चर्चा ऐकून भडकल्या होत्या रिना रॉय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 08:00 AM2020-12-29T08:00:00+5:302020-12-29T08:00:07+5:30
शत्रुघ्न यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा रीना रॉयसारखी दिसते, यावरून एक वेगळीच चर्चा रंगली होती...
70 व 80 च्या दशकात रिना रॉय सर्वात महागडी अभिनेत्री होती. नागीन, आशा अशा अनेक सिनेमातील रिना रॉय यांच्या अदाकारीचे कौतुक आजही होते. एकेकाळी याच रिना रॉय शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत होत्या.
‘कालीचरण’ या सिनेमात रिना व शत्रूची जोडी झळकली आणि याच सिनेमाच्या सेटवरून दोघांच्या अफेअरच्या चर्चा ऐकू येऊ लागल्यात. पुढे तर या प्रेमकहाणीचे अनेक किस्से प्रकाशित झालेत. असे म्हणतात की, रिना व शत्रू यांना लग्न करायचे होते. मात्र, दोघांचे लग्न झाले नव्हते. पण शत्रुघ्न यांची मुलगी सोनाक्षी सिन्हारीना रॉयसारखी दिसते, यावरून एक वेगळीच चर्चा रंगली होती. रिना मात्र या चर्चांमुळे चांगल्याच खवळल्या होत्या.
सलमान खानच्या दबंग चित्रपटाद्वारे सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा बरेच लोक तिला पाहून आश्चर्यचकित झाले होती. सोनाक्षी मध्ये लोकांना रिना रॉयची झलक दिसली होती. सोनाक्षी ही शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची कन्या नसून रीना-शत्रुघ्न यांची कन्या आहे, इथपर्यंत लोक म्हणाले. काही वर्षांपूर्वी रीना रॉय यांना याबद्दल छेडले असता त्या चांगल्याच संतापल्या होत्या.
‘सोनाक्षी माझ्यासारखी नाही तर सोनाक्षी तिची आई पूनम सिन्हासारखी आहे. मी ‘जख्मी’ चित्रपटात काम केले तेव्हा मी सुद्धा आशा पारेख आणि नासिर हुसेन यांची मुलगी असल्याचे लोकांनी म्हटले होते. डिंपलला लोकांनी नर्गिसची मुलगी ठरवले होते. चित्रपटसृष्टीत हा ट्रेंड आहे आणि कदाचित आजही कायम आहे. हे काही दिवसांनी संपेल, असे त्या म्हणाल्या होत्या.
रिना यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत पहिल्यांदा काम केले, त्यावेळी त्या केवळ 19 वर्षांच्या होत्या तर शुत्रुघ्न त्यांच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठे होते. पहिल्याच चित्रपटापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. ते दोघे लग्न करणार असे सर्वांना वाटत असतानाच शत्रुघ्न यांनी पूनमसोबत लग्न केले. लग्नानंतर देखील शत्रुघ्न यांच्या आयुष्यात रिना यांचे स्थान कायम होते. रिना आणि त्यांच्या नात्याविषयी शत्रुघ्न यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.
‘खामोश: द शत्रुघ्न सिन्हा’ या शत्रुघ्न सिन्हा यांच्या बायोग्राफीमध्ये देखील शत्रुघ्न आणि रिना यांच्या अफेअरचा उल्लेख करण्यात आला आहे.
स्टारडस्ट या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न बेधडक बोलले होते. तुम्ही पूनमसोबत लग्न केले त्यावेळी रिना तुमच्या आयुष्यात होत्या का? या प्रश्नावरचे त्यांचे उत्तर तर हैराण करणारे होते. ‘ लग्नाची मला खरोखर भीती वाटत होती. मी त्यावेळी कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हतो. खरे तर मी लग्नाचा माझा निर्णय मागे घ्यावा असेच शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटत होते. लग्न मुंबईत होते आणि मी लंडनमध्ये होतो. अगदी लग्नाला काही तास उरले असताना मी विमान पकडून मुंबईत आलो होतो. पूनमलाही माझी खात्री नव्हती. पण मी आलो आणि लग्न केले. पूनम व माझ्या नात्यात माझ्याकडून अनेकवेळा चुका झाल्या, पण तरीही पूनमने मला नेहमीच साथ दिली.
याच मुलाखतीत रिना यांच्यावर तुमचे इतके प्रेम होते तर त्यांच्यासोबत लग्न का केले नाही? असा थेट सवाल शत्रुघ्न यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी सांगितले होते की, लग्न हे कोणत्याही समस्येवर उत्तर असू शकत नाही. मी लग्नानंतरही रिनाला लोकांच्या समोर भेटत होतो. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. अनेक गोष्टीत रिना माझा सल्ला घेत असे. लग्नानंतर मी तिच्याकडे दुर्लक्ष करणे मला पटत नव्हते. मी तिला एका पार्टीत भेटलो तर त्यावरून चर्चा सुरु झाली. रिनामुळेच मी पूनमला त्या पार्टीत नेले नव्हते, असेही लोकांनी म्हटले. माझ्यामते, हे पूर्णपणे चुकीचे होते. मी समाजाच्या दबावामुळे कोणताही निर्णय घेतला नव्हता. माझ्या मनाचे ऐकूनच मी निर्णय घेतला होता.