ऋषी कपूर यांना मृत्यूपूर्वी एकदा तरी जायचे होते पाकिस्तानला, हे होते कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:36 PM2020-04-30T15:36:11+5:302020-04-30T15:40:06+5:30
ऋषी कपूर यांना मृत्यूपूर्वी एकदा तरी पाकिस्तानला जाण्याची इच्छा होती. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये देखील याविषयी सांगितले होते.
काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
ऋषी कपूर यांना मृत्यूपूर्वी एकदा तरी पाकिस्तानला जाण्याची इच्छा होती. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये देखील याविषयी सांगितले होते. त्यांना पाकिस्तानला का जायचे होते यामागे एक खास कारण होते. ऋषी कपूर यांचे पूर्वज पाकिस्तानातील पेशावर प्रांतातील होते. ऋषी यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर यांचे वडील देवान कपूर यांनी 1918 मध्ये तिथे घर बांधले होते. भारत-पाकिस्तानाची फाळणी 1947 मध्ये झाल्यानंतर कपूर कुटुंब भारतात आले होते. त्यामुळे ऋषी कपूर यांना एकदा तरी पाकिस्तानात जाऊन त्यांचे हे मूळ घर पाहाण्याची इच्छा होती. हे घर मला काही कारणांमुळे पाहाता आले नाही तर रणबीर किंवा त्याच्या पुढच्या पिढीला तरी तिथे जायला मिळावे असे मला वाटते, असे त्यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. काल रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.