सलमान खानच्या एक्सने अनेक वर्षांनी दिली कबुली, सलमानसोबत लग्न करायचे होते पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 05:46 PM2021-02-11T17:46:56+5:302021-02-11T17:47:54+5:30
सलमानची ही एक्स एक अभिनेत्री असून तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले आहे.
सलमान खानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. सोमी अली मुळची पाकिस्तानची. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ती ओळखली जाते. सोमीची आई इराकी आणि वडील पाकिस्तानी आहेत. १२ वर्षांपर्यंत सोमी पाकिस्तानात शिकली. यानंतर आपल्या पालकांसोबत फ्लोरिडाला शिफ्ट झाली. सोमीला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये करियर करायचे होते. पण ती बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण सलमान खान होते. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचे क्रश होते. याविषयी तिनेच नुकतीच कबुली बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
सलमानने या मुलाखतीत सांगितले आहे की, मैंने प्यार किया पाहिल्यानंतर सलमानची मोठी फॅन झाली होती. त्याला भेटता यावे, त्याच्यासोबतच लग्न करता यावे यासाठी मी भारतात आले. मी मुंबईत आले, त्यावेळी केवळ १६ वर्षांची होते. माझे भाग्य चांगले असल्याने मुंबईत आल्यावर काहीच दिवसांत सलमानला भेटले, त्याच्यासोबत काम करण्याची देखील मला संधी मिळाली. खरे सांगू तर मला अभिनयात अजिबातच रस नव्हता. केवळ सलमानशी मैत्री करायची इतकीच माझी इच्छा होती आणि माझी ती इच्छा पूर्ण देखील झाली.
सलमान आणि सोमी आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सोमीने १९९१ ते १९९७ या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. १९९९ मध्ये तिचे आणि सलमानचे ब्रेकअप झाले. याचे कारण होते, ऐश्वर्या राय. या ब्रेकअपनंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही. यानंतर २०११ मध्ये ती सलमानला भेटली होती. सलमान एका शूटींगसाठी बँकॉकला गेला होता. तिथे सोमीदेखील तिच्या कामाच्या निमित्ताने आली होती. तिथे अनेक वर्षांनी त्यांची पुन्हा भेट झाली होती.
सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्लोरिडाला परतली. तिथे तिने सायकॉलॉजीचे शिक्षण घेतले. यानंतर मियामी युनिव्हर्सिटीतून जर्नालिझम केले. यादरम्यान डॉक्युमेंट्री बनवण्यात तिला रस वाटू लागला. पुढे तिने न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीत प्रवेश घेतला. त्यानंतर सोमीने महिलांच्या आयुष्यावर काही लघुपट बनवले. २००६ मध्ये तिने महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला सुरुवात केली आणि नो मोअर टीअर्स नावाची संस्था स्थापन केली. वयाच्या पाचव्या वर्षी सोमीवर लैंगिक अत्याचार झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचे खरे कारण होते. आता सोमी जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत.