या कारणामुळे विनोद मेहरा यांच्या आईने रेखा यांना मारण्यासाठी काढली होती चप्पल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 06:00 AM2019-10-30T06:00:00+5:302019-10-30T06:00:02+5:30
विनोद मेहरा यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले.
विनोद मेहरा यांनी अनुराग, कुवारा बाप, नागिन, अनुरोध, आखिरी कसम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1945 ला पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला होता. त्यांचे कुटुंब कामानिमित्त मुंबईत आले आणि ते इथेच स्थायिक झाले. विनोद मेहरा यांनी केवळ काही वर्षांच्या कारकिर्दीत एकाहून एक चित्रपट बॉलिवूडला दिले. ते केवळ 45 वर्षांचे असताना 30 ऑक्टोबर 1990 ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले.
विनोद मेहरा यांनी तीन लग्नं केली होती आणि त्यापैकी त्यांच्या दोन पत्नी या अभिनेत्री होत्या. त्यांचे लग्न रेखा आणि बिंद्या गोस्वामी यांच्यासोबत झाले होते. यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर रेखाः द अन्टोल्ड स्टोरी हे पुस्तक लिहिले होते. रेखा आणि विनोद मेहरा यांनी लग्न केल्यानंतर ते विनोद मेहरा यांच्या घरी गेल्यानंतर काय घडले होते याविषयी या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, रेखा आणि विनोद यांनी कोलकत्तामध्ये लग्न केले होते. या लग्नानंतर ते दोघे मुंबईला आले. दोघे विनोद मेहरा यांच्या घरी पोहोचले त्यावेळी विनोद मेहरा यांची आई प्रचंड भडकलेल्या होत्या. रेखा आशीर्वाद घेण्यासाठी सासूच्या पाया पडायला गेल्या तर त्यांनी चक्क पाय मागे घेतले होते आणि रेखा यांना मारण्यासाठी त्यांनी चप्पल काढली होती. रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केले असले तरी त्यांनी कधीच ही गोष्ट मीडियात मान्य केली नाही.
विनोद मेहरा यांचे पहिले लग्न मीना ब्रोका यांच्यासोबत झाले होते. हे अरेंज्ड मॅरेज होते. लग्नानंतर सगळे काही सुरळीत सुरू असताना विनोद यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांची तब्येत काही महिन्यांनी सुधारली. पण त्यानंतर मीना आणि विनोद त्यांच्यात सतत वाद व्हायला लागले. त्याच दरम्यान बिंद्या गोस्मावी त्यांच्या आयुष्यात आल्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्या दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यांच्या अफेअरविषयी विनोद यांच्या पत्नीला कळल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या घरातील मंडळींनी या प्रकरणात मध्यस्थी केली. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी लपूनछपून बिंद्या यांच्यासोबत लग्न देखील केले. पण लग्नानंतर विनोद यांना तितके हिट चित्रपट देता आले नाहीत. लग्नानंतर काहीच महिन्यात बिंद्या यांच्या आयुष्यात जे पी दत्ता आले आणि त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केले.