"तुम्ही मरणार आहात असं वाटतं, तेव्हा ECG ही"; हार्ट अटॅकमधून वाचल्यानंतर श्रेयस तळपदेचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 01:37 PM2024-02-16T13:37:06+5:302024-02-16T13:37:34+5:30
अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ला डिसेंबर महिन्यात हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर जवळपास २ महिने आराम केल्यानंतर तो एका इव्हेंटमध्येही सहभागी झाला होता.
मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने आपली छाप उमटविली आहे. अभिनेत्याला डिसेंबर महिन्यात हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर जवळपास २ महिने आराम केल्यानंतर तो एका इव्हेंटमध्येही सहभागी झाला होता. त्याच्यासारख्या फिट व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला, हे ऐकून आश्चर्य व्यक्त केले जात होते. नुकतेच एका मुलाखतीत श्रेयसने याबद्दल सांगितले. त्याच्या मते ECG हा सर्वात मोठा जोक आहे.
श्रेयस तळपदे याने नुकतेच मित्र म्हणे या पॉडकास्ट मुलाखतीत सांगितले की, त्यावेळी त्याला डॉक्टरांनी सांगितले की, हार्ट अटॅक आला त्यादिवशी त्याला जो वेळ मिळाला तो त्याच्या फिटनेसमुळे. शूटिंग संपल्यानंतर तो घरी आला आणि तिथून हॉस्पिटलमध्ये गेला. तो साधारण वेळ एक ते दीड तासाचा होता. एवढा वेळ मिळाल्याचे मुख्य कारण डॉक्टरांनी सांगितले ते म्हणजे त्याचे फिटनेस. फिट असल्यामुळे माझे हृदय तेवढे वेळ चालू राहिले. जेव्हा मी हॉस्पिटल पाहिले तेव्हा मी निश्चिंत झालो. त्यामुळे कदाचित हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचंय या विचाराने मी तोपर्यंत जो लढत होते, तो विचार मी जाऊ दिला.
डॉक्टरांची माफी मागून मला सांगावसे वाटते की...
श्रेयस ECG बद्दल म्हणाला की, सर्व डॉक्टरांची माफी मागून मला सांगावसे वाटते की इसीजी हा सर्वात मोठा जोक आहे. जेव्हा तुम्हाला हृदय विकाराचा झटका येत असतो, तुम्हाला वाटते की तुम्ही मरणार आहात. तेव्हा ECG ही तुम्हाला तेच सांगतो की, हो तुम्ही बरोबर आहात. मला असे वाटते की त्याचा काहीही उपयोग नाही.