Amruta Fadnavis: राजकीय 'किटी पार्टी'त कुणाला बोलवणार? अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 17:51 IST2023-01-07T17:51:20+5:302023-01-07T17:51:44+5:30
अमृता फडणवीस यांच्याशी 'लोकमत'नं केलेल्या खास गप्पांमध्ये त्यांनी गाण्याबद्दल माहिती तर दिलीच पण इतरही विषयांवर दिलखुलासपणे संवाद साधला.

Amruta Fadnavis: राजकीय 'किटी पार्टी'त कुणाला बोलवणार? अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तर...
मुंबई-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आता त्यांच्या बँकिंग क्षेत्रापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्यांनी आता गायनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या गाण्याचा छंद जोपासत अनेक गाणी प्रेक्षकांसाठी आणली. आता आणखी एक नवं गाणं त्या घेऊन आल्या आहेत. अमृता फडणवीस आता 'मूड बना लेया वे' हे पंजाबी गाणं घेऊन आल्या आहेत. नुकतंच त्यांचं हे नवं गाणं प्रदर्शित झालं आणि याही गाण्याचा चांगली पसंती मिळत आहे. गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात अमृता फडणवीस यांच्याशी 'लोकमत'नं केलेल्या खास गप्पांमध्ये त्यांनी गाण्याबद्दल माहिती तर दिलीच पण इतरही विषयांवर दिलखुलासपणे संवाद साधला.
राजकारणाशी निगडीत महिलांची 'किटी पार्टी' जर तुम्ही आयोजित केली तर कुणाकुणाला बोलवणार? असं विचारलं असता त्यांनी सर्वपक्षीय महिला नेत्यांना प्राधान्य देऊ असं मनमोकळेपणानं म्हटलं. "स्त्रियांचं गेट टू गेदर जर मी आयोजित केला तर मी नक्कीच भाजपाच्या महिला नेत्या आहेत त्यांना तर बोलवेनच पण राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या सर्वच पक्षांच्या महिलांना बोलवेन. कारण एक महिला शक्ती जर एकत्रित आली तर मिळून महिलेंच्या तरी समस्यांबाबत काम करू शकू", असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!’ असे अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे बोल आहेत. अमृता यांनी काही दिवसांपूर्वी या गाण्याचं पोस्टर शेअर केलं होतं. आता हे गाणं प्रदर्शित झालं असून त्याला चांगली पसंती देखील मिळत आहे.