Abhishek Bachchan Karisma Kapoor : अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचा साखरपुडा का मोडला? इतक्या वषार्नंतर सत्य आलं समोर...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 11:03 AM2022-11-22T11:03:44+5:302022-11-22T11:07:01+5:30
Abhishek Bachchan Karisma Kapoor : अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर यांचा साखरपुडा मोडला. का? तर या प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत गुलदस्त्यात होतं. पण आता इतक्या वर्षानंतर याचा खुलासा झाला आहे...
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय सध्या आपल्या संसारात आनंदी आहेत. पण ऐश्वर्याआधी अभिषेकचा करिश्मा कपूरसोबत साखरपुडा झाला होता. होय, एकेकाळी अभिषेक बच्चन ( Abhishek Bachchan ) व करिश्मा कपूर ( Karisma Kapoor ) दोघंही लग्न करणार होते. पण अचानक हा साखरपुडा मोडला. का? तर या प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत गुलदस्त्यात होतं. पण आता इतक्या वर्षानंतर याचा खुलासा झाला आहे.
होय, दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक व करिश्माचा साखरपुडा मोडण्यामागच्या कारणांचा खुलासा केला.
चर्चा खरी मानाल तर अभिषेक व करिश्मा सुमारे 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2000 साली सुनील दर्शनने या जोडप्यासोबत ‘हां मैंने भी प्यार किया’ नावाचा सिनेमा केला होता. या शूटींगवेळी करिश्मा व अभिषेक यांच्या नात्यातील बदल सुनील दर्शन यांनी बघितली होता. सुनील दर्शन यांचा हा सिनेमा आपटला आणि या चित्रपटासोबत करिश्मा व अभिषेकचं नातंही संपलं.
काय मोडला साखरपुडा?
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन करिश्मा व अभिषेकच्या नात्याबद्दल बोलले. ते म्हणाले, करिश्मा व अभिषेकचं नातं या अफवा नव्हत्या. ते दोघंही लग्न करणार होते. मी स्वत: दोघांच्या साखरपुड्याला हजर होतो. पण ‘हां मैंने भी प्यार किया’च्या शूटींगवेळी मी वेगळंच काही बघत होतो. करिश्मा व अभिषेक मेड फॉर इच अदर नाहीत, हे मला जाणवलं होतं. कारण दोघंही सेटवर कायम भांडत असायचे. ते दोघंही एकमेकांसाठी बनलेले नव्हते. ते नेहमी भांडायचे. कदाचित काही माणसं अशीच असतात. हे दोघं खरंच एकमेकांसाठी बनले आहेत का? असा प्रश्न मला त्यांना पाहून पडायचा. अभिषेक गोड मुलगा आहे. करिश्माही चांगली मुलगी आहे. पण कदाचित नियतीने त्यांच्यासाठी वेगळं काही लिहून ठेवलं असावं.
करिश्माच्या एका अटीमुळे मोडलं लग्न?
2002 मध्ये करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चनचा साखरपुडा झाला होता. मात्र हा साखरपुडा मोडला. अभिषेक व करिश्माचा साखरपुडा का मोडला? खरं तर यावर अभिषेक व करिश्मा कधीही काही बोलले नाहीत. पण असं म्हणतात की, करिश्माच्या एका अटीमुळे तिचं व अभिषेकचं लग्न होता होता राहिलं. करिश्मा व अभिषेक एकमेकांच्या प्रेमात होते. यानंतर दोघांच्याही घरच्यांनी दोघांचा साखरपुडा ठरवला. साखरपुडा पार पडला. यामुळे दोन्ही कुटुंब आनंदात होते. पण याचदरम्यान करिश्माने अशी काही अट ठेवली की अभिषेक भडकला. चर्चा खरी मानाल तर करिश्माला लग्नानंतर वेगळं राहायचं होतं. अभिषेकने लग्नानंतर तिच्यासोबत वेगळ्या घरात शिफ्ट व्हावं, अशी तिची अट होती. अभिषेकला तिची ही अट मान्य नव्हती. करिश्माही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. अखेर अभिषेकने हे लग्न मोडणंच योग्य समजलं.
पुढे 2003 मध्ये करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केलं. 2016 मध्ये करिश्माने पती संजय कपूरपासून घटस्फोट घेतला. अभिषेकने ऐश्वर्यासोबत लग्नगाठ बांधली. आज अभिषेक ऐश्वर्यासोबत आनंदी आहे.
वडिलांची होती ही इच्छा...
करिश्मा कपूरबद्दलची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, तिचे वडील रणधीर कपूर यांना तिचं लग्न अक्षय खन्नाशी व्हावं असं वाटत होतं. असे म्हणतात की, रणधीर यांनी करिश्मासाठी अक्षय खन्नाची निवड केली होती. विनोद खन्ना यांच्याकडे त्यांनी तसा प्रस्तावही पाठवला होता. पण एक व्यक्ति या लग्नाआड आली आणि हे लग्न सुद्धा होता होता राहिलं. होय, करिश्माची आई बबीता यांनी या लग्नाला विरोध केला. त्याकाळात करिश्मा यशाच्या शिखरावर होती. करिश्माने याकाळात लग्न करू नये, अशी बबीतांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेखातर करिश्माच्या लग्नाचा विषय मागे पडला आणि अक्षय व करिश्माच्या लग्नाची बोलणीही थांबली.