ऐश्वर्या राय बच्चनला का मिळतोय डच्चू? काय आहे कारण??
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 09:36 PM2018-09-17T21:36:08+5:302018-09-17T21:38:57+5:30
ज्या काळात ऐश्वर्या राय बच्चनला नवनव्या भूमिकांची गरज आहे, त्याच काळात तिच्या हातून एकापाठोपाठ एक चित्रपट निसटतांना दिसत आहेत.
ज्या काळात ऐश्वर्या राय बच्चनला नवनव्या भूमिकांची गरज आहे, त्याच काळात तिच्या हातून एकापाठोपाठ एक चित्रपट निसटतांना दिसत आहेत. होय, ४४ वर्षांच्या ऐश्वर्याला आपले फिल्मी करिअर वाचवायचे तर कायम नव्या पिढीशी कनेक्ट राहणे गरजेचे आहे आणि यासाठी ती नव-नव्या चित्रपटात दिसणे गरजेचे आहे. पण तूर्तास तरी असे चित्र नाही. २०१५ मध्ये ऐश्वर्याने दणक्यात कमबॅक केले. पण तिला यश लाभले नाही. मात्र आता अनेक निर्माते-दिग्दर्शक ऐश्वर्याला आपल्या चित्रपटात घेण्यास फारसे उत्सूक नसलेले दिसत आहे. याला कारणीभूत कुणी दुसरे नसून खुद्द ऐश्वर्या असल्याचे जाणकारांचे मत आहे. जाणकारांचे मानाल तर सध्या कलाकार प्रचंड स्वार्थी झाले आहेत. चित्रपटाच्या कथेपेक्षा आपली स्वत:ची व्यक्तिरेखा अधिकाधिक दमदार असावी, याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळे अनेक स्टार पटकथेत ढवळाढवळ करू लागले आहेत. विशेष म्हणजे, स्क्रिप्टचे फारसे ज्ञान नसताना त्यात अनेक बदल सुचवून मनासारख्या भूमिका पदरात पाडून घेण्याची या कलाकारांची धडपड आहे. ऐश्वर्याही यातलीच एक. गत काही वर्षांत तिच्याकडे चित्रपटाच्या आॅफर्स आल्याचं नाहीत, असे नाही. पण ऐश्वर्याला प्रत्येक स्क्रिप्ट तिच्या मर्जीनुसार लिहिली जावी, असे वाटत होते. याचा परिणाम म्हणजे, अनेक चांगले प्रोजेक्ट तिच्या हातून गेलेत.
आॅगस्टच्या अखेरिस निर्माता शैलेश आर. सिंह याच्या उत्तरप्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित एका चित्रपटातून ऐश्वर्याला डच्चू देण्यात आला. यानंतर सप्टेंबर महिन्यात अन्य दोन चित्रपटातूनही तिला डच्चू मिळाला. यातला एक म्हणजे, ‘वो कौन थी’चा हिंदी रिमेक. या चित्रपटात ऐश्वर्याच्या जागी बिपाशा बासूला घेण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय निर्माता श्रीनारायण सिंह यांच्या ‘जास्मीन’मधूनही ऐश्वर्या आऊट झाली आहे. या तिन्ही चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याला मनासारखी स्क्रिप्ट हवी होती. ती वारंवार त्यात बदल सुचवत होती. सुरूवातीला निर्माता दिग्दर्शकांनी तिच्या मनासारखे बदल केलेही. पण हिरोईन डोईजड होतेय, म्हटल्यावर त्यांनी तिला बदलवणेच योग्य समजले. आता यातले खरे काय नि खोटे काय, ऐश्वर्यालाचं जाणो.