पंकज त्रिपाठी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचे हे काम, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:02+5:30
पंकज मनोज वाजपेयीचा खूप मोठा फॅन आहे. त्याची अनेक वर्षांपूर्वी मनोजशी भेट झाली होती. पण त्यावेळी पंकज एका ठिकाणी नोकरी करत होता.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी आणि कुमार विश्वास हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात ते तिघेही आपल्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्से सांगणार आहेत.
गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी पंकज त्रिपाठी यांनी मनोज वायपेयीला एक खास गोष्ट सांगितली होती. याविषयी या कार्यक्रमात मनोजने सांगितले. तो म्हणाला, गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाचे आम्ही चित्रीकरण करत असताना पंकजने मला येऊन सांगितले की, तुम्ही ज्यावेळी पटनाला आला होता, त्यावेळी तुमचे शूज हरवले होते, हे शूज माझ्याकडे आहेत. पंकजने सांगितलेली ही गोष्ट ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यावेळी मला आठवले की, मी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पटनाला गेलो होतो, त्यावेळी मी हॉटेल मौर्यामध्ये राहिलो होतो. त्यावेळी माझे शूज मी त्या हॉटेलमध्ये विसरलो होतो.
याविषयी पंकजने पुढे सांगतले की, मी काही वर्षांपूर्वी पटनामधील मौर्या या हॉटेलमध्ये रूम सुपरव्हायझर म्हणून काम करत होतो. मनोज वाजपेयी माझ्या हॉटेलमध्ये येणार हे कळल्यावर मी खूपच खूश झालो होतो. कारण मी मनोज वाजपेयी यांचा खूप मोठा फॅन आहे. मी हॉटेलमधील सगळ्यांना सांगितले होते की, त्या रूममधून कोणतीही ऑडर येईल ती ऑडर केवळ मीच द्यायला जाईल. मला आजही आठवते, त्यांनी सुप आणि चार सफरचंदाची ऑडर दिली होती. मी 50-60 सफरचंदामधून केवळ चार सफरचंदाची निवड केली होती. हॉटेलमधून परत जाताना मनोज या हॉटेलमध्ये त्यांचे शूज विसरले होते. हे शूज हॉटेल टीमच्या स्वाधीन न करता मी माझ्याकडे त्यांची आठवण आणि आशीर्वाद म्हणून ठेवून दिले होते.