या कारणामुळे कार्तिक आर्यनने खाल्ला होता आईचा बेदम मार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 09:00 PM2019-03-02T21:00:00+5:302019-03-02T21:00:03+5:30
कार्तिक एक खोडकर मुलगा होता. तो प्रचंड मस्ती करत असे. अभ्यासापेक्षा खेळण्यात त्याला अधिक रस होता.
‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आपल्या रूपाने आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना मोहित करणारे कृती सेनन आणि कार्तिक आर्यन लवकरच हजेरी लावणार आहेत. या बॉलिवुडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्यांशी भारताचा लाडका विनोदवीर कपिल शर्मा गप्पा गोष्टी करणार आहे. या कार्यक्रमात दोन्ही अभिनेत्यांनी वैयक्तिक आयुष्यातील काही मनोरंजक किस्से देखील सांगितले.
मोठमोठ्या कलाकारांकडून त्यांच्या चाहत्यांना माहीत नसलेल्या गोष्टी खूबीने काढून घेण्यासाठी कपिल प्रसिद्ध आहे. कार्तिकने देखील त्याच्या आयुष्यातील एक गुपित या कार्यक्रमात सांगितले. त्याने सांगितले की, “जेव्हा मी जबलपूरमध्ये होतो आणि माझ्या आजी-आजोबांसोबत राहात होतो, तेव्हा मी नेहमी सकाळी प्राणी संग्रहालयात घेऊन जाण्यासाठी नानूच्या म्हणजेच माझ्या आजोबांच्या मागे लागायचो.” तुला रोजच प्राणीसंग्रहालायात का जायचे असायचे असे कार्तिकला त्याच्या सहकलाकारांनी आणि कपिल शर्माने विचारले असता त्याने सांगितले, “मला हत्तींना शी करताना बघण्याचे विचित्र आकर्षण होते. मला माहीत आहे हे खूप विचित्र आहे. पण मला त्यावेळी ते फार मनोरंजक वाटायचे. म्हणून रोज सकाळी मी प्राणी संग्रहालयात जाण्यासाठी त्यांच्या मागे लागायचो.” हे ऐकल्यावर कपिल आणि सेटवर असलेल्या सगळ्यांची हसून हसून पुरेवाट लागली. कपिलने पुढे विचारले की, त्याच्या नानूंनी त्याची ही मागणी का पूर्ण केली? त्यावर कार्तिक म्हणाला, “शायद उनको भी पसंद था वो देखना.”
कार्तिक एक खोडकर मुलगा होता. तो प्रचंड मस्ती करत असे. अभ्यासापेक्षा खेळण्यात त्याला अधिक रस होता. तुझा आवडता खेळ कोणता होता असे कपिलने कार्तिकला विचारल्यावर त्याने सांगितले की, मला व्हिडिओ गेम्स खेळायला आवडायचे. मी अभ्यासापेक्षाही व्हिडिओ गेम्सला प्राधान्य देत होतो आणि एकदा मला आईने अभ्यास न करता व्हिडिओ गेम खेळताना पकडले देखील होते. मी शिकवणी बुडवायचो आणि त्याऐवजी माझ्या मित्रांसोबत व्हिडिओ गेम्स खेळायला जायचो. आईने एक दिवस माझ्या शिकवणीच्या शिक्षकांना माझा अभ्यास कसा चालला आहे हे विचारण्यासाठी फोन केला. माझ्या आईने विचारले ‘कैसा पढाई कर रहा है मेरा बेटा” आणि तिला आश्चर्य वाटले कारण शिक्षकांनी तिला विचारले ‘कौन सा बेटा?” त्यादिवशी जेव्हा मी घरी परत आलो, तेव्हा मी माझ्या आईकडून चांगलाच मार खाल्ला.”