A. R. Rahman : “ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जातात”, एआर रहमान असं का बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:12 PM2023-03-16T12:12:00+5:302023-03-16T12:13:58+5:30
A. R. Rahman : एकीकडे भारतीय ऑस्कर विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे संगीतकार एआर रहमान यांची एक मुलाखत व्हायरल होतेय.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताने एक नव्हे दोन ऑस्करवर नाव कोरलं. आरआरआर सिनेमातील नाटू नाटू या गाण्याला आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला ऑस्कर देऊन गौरविण्यात आलं. हा क्षण तमाम भारतीयांना सुखावणारा ठरला. एकीकडे भारतीय ऑस्कर विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे संगीतकार एआर रहमान (A. R. Rahman) यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होतेय. ऑस्करसाठी चुकीचे सिनेमे पाठवले जात असल्याचं ते मुलाखतीत म्हणताना दिसत आहे. ही जानेवारी महिन्यात शूट केलेली मुलाखत आहे. एआर यांच्या युट्यूब चॅनलवर ती १५ मार्चला अपलोड केलेली आहे.
अनेक संगीतकार आणि ऑर्केस्ट्राबरोबर म्युझिक तयार करण्याची ट्रॅडिशनल रेकॉर्डिंग पद्धत कशी बदलली, असा प्रश्न एल. सुब्रमण्यम एआर यांना या मुलाखतीत विचारतात. यावर एआर म्हणतात, “हे तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शक्य झालं. मी जिंगल बॅकग्राऊंडमधून आलो होतो, त्यामुळे माझ्याकडे अनेक पर्याय होते. मी त्यात बरंच काही करू शकत होतो. त्या काळी ऑर्केस्ट्रा महाग होता. त्या काळात अनेक आव्हानं होती, त्याच काळात मला प्रयोग करायला भरपूर वेळ मिळाला. आम्ही अनेक नवे प्रयोग केलेत. अनेकदा अपयशी झालोत.माझं अपयश कोणालाच माहीत नाही, लोकांनी फक्त माझं यश पाहिलं आहे, कारण हे सर्व स्टुडिओमध्ये घडलं होतं. होम स्टुडिओमुळे मला स्वातंत्र्य मिळाले. सर्वांना पैशांची गरज आहे पण माझ्यात त्यापलीकडची एक लालसा होती. पश्चिमी देश करत आहेत, मग मी का करू शकत नाही? आपण त्यांचे संगीत ऐकतो, तर मग ते आपली गाणी का ऐकू शकत नाहीत?, असे प्रश्न मला पडायचे. आणखी चांगल प्रॉडक्शन, आणखी चांगली गुणवत्ता, चांगले वितरण आणि मास्टरिंग कसं करता येईल, हा विचार सतत माझ्या डोक्यात असतो आणि यामुळे मला प्रेरणा मिळते.”
ऑस्कर का मिळत नाही...
या मुलाखतीत त्यांनी ऑस्कर पुरस्कारबद्दलही भाष्य केलेलं आहे. “ आपले चित्रपट ऑस्करपर्यंत जातात, पण पुरस्कार मिळत नाहीत. माझ्यामते, ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जात आहेत. प्लीज, असं करू नका, असं मला त्यावेळी म्हणावंस वाटतं. आपण समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. यासाठी पाश्चिमात्य देशाप्रमाणे विचार करावा लागेल,” असं एआर यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.