प्रकाश राज भाजपात प्रवेश करणार? 'त्या' पोस्टवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाले- "त्यांनी प्रयत्न केला पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 09:06 AM2024-04-05T09:06:39+5:302024-04-05T09:07:08+5:30
भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर प्रकाश राज स्पष्टच बोलले, म्हणाले, "मला विकत घेण्याइतके ते श्रीमंत..."
आपल्या अभिनयाने हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारा ग्रेट अभिनेता म्हणजे प्रकाश राज. विविधांगी भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पण, त्यांनी साकारलेल्या खलनायकाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली. प्रकाश राज हे अभिनयाबरोबरच त्यांच्या वक्तव्यासाठीही ओळखले जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते समाजातील अनेक घडामोडींबाबत भाष्य करताना दिसतात. अनेकदा त्यांचे राजकीय ट्वीटही व्हायरल होत असतात.
प्रकाश राज अनेकदा त्यांच्या ट्वीटमधून भाजपावर टीकाही करताना दिसतात. पण, भाजपाविरोधी असलेले प्रकाश राज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे चाहतेही आश्चर्यचकित झाले. पण, यावर आता प्रकाश राज यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रकाश राज भाजपात प्रवेश करणार असल्याचं एका X अकाऊंटवरुन म्हटलं होतं. या ट्वीटचा फोटो प्रकाश राज यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रकाश राज यांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये "प्रकाश राज आज दुपारी ३ वाजता भाजपात प्रवेश करतील", असं म्हटलं आहे. यावर प्रकाश राज यांनी उत्तर देताना पुन्हा भाजपाला टोला लगावला आहे. "मला वाटतं त्यांनी प्रयत्न केला असेल. पण, नंतर त्यांना कळलं असेल की ते इतके श्रीमंत(वैचारिकदृष्ट्या) नाहीत की मला विकत घेऊ शकतील. तुम्हाला काय वाटतं?", असं म्हणत त्यांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.
I guess they tried 😂😂😂 must have realised they were not rich enough (ideologically) to buy me.. 😝😝😝.. what do you think friends #justaskingpic.twitter.com/CCwz5J6pOU
— Prakash Raj (@prakashraaj) April 4, 2024
दरम्यान, याआधीही अनेकदा प्रकाश राज यांनी भाजपावर टीका केली होती. भाजपाचं समर्थन करणाऱ्या आणि निवडणुकीसाठी तिकीट मिळालेल्या कंगना रणौतवरही त्यांनी अनेकदा निशाणा साधला आहे.