कष्ट केले, करोडपती झाले; वाचा ‘या’ स्टार्सची यशोगाथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 11:09 AM2017-07-30T11:09:58+5:302017-07-30T16:52:27+5:30

जेव्हा आपण एखाद्या यशस्वी कलाकाराला पडद्यावर बघतो, तेव्हा आपल्या मनात आपसुकच त्याच्या गडगंज श्रीमंतीच्या कल्पना रंगतात. मात्र ही श्रीमंती ...

Worked hard, crooked; Read 'or' Stars Success Story! | कष्ट केले, करोडपती झाले; वाचा ‘या’ स्टार्सची यशोगाथा!

कष्ट केले, करोडपती झाले; वाचा ‘या’ स्टार्सची यशोगाथा!

googlenewsNext
जेव्हा आपण एखाद्या यशस्वी कलाकाराला पडद्यावर बघतो, तेव्हा आपल्या मनात आपसुकच त्याच्या गडगंज श्रीमंतीच्या कल्पना रंगतात. मात्र ही श्रीमंती कशी मिळाली हा कदाचित कोणी विचार करीत नाही. कारण आज ज्या यशस्वी कलाकारांच्या श्रीमंती आणि ग्लॅमरकडे बघून आपण चकीत होतो, त्याच कलाकारांना हे सगळं मिळविण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडचा किंग म्हणून ज्याला आपण ओळखतो त्या शाहरूख खानची एकेकाळची कमाई केवळ ५० रुपये होती, तर खिलाडी अक्षयकुमारने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. असेच परिश्रम घेऊन यशस्वी झालेल्या कलाकारांची यशोगाथा सांगणारा हा वृत्तांत...




रजनीकांत
दाक्षिणात्य सुपरस्टार, मेगास्टार अशा विविध बिरुदावली मिळालेले अभिनेते रजनीकांत यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. मात्र अशातही जेव्हा-जेव्हा आपण रजनीकांत यांना आॅफस्क्रीन बघतो तेव्हा त्यांचे ग्लॅमरस आणि स्टायलिश लुक आपणास अजिबातच जाणवत नाही. करोडपती रजनी यांचा हाच साधेपणा त्यांना सुपरस्टार बनवितो. रजनी यांच्या या साधेपणाबद्दल असेही म्हटले जाते की, ते अजूनही जमिनीवर असलेले कलाकार आहेत. कारण अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर रजनी बस कंडक्टर म्हणून काम करीत होते. 



शाहरूख खान
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या सध्याच्या संपत्तीचा विचार केल्यास कोणाच्याही मनात असा विचार येणार नाही की, कधीकाळी शाहरूखला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. परंतु वास्तव हे आहे की, शाहरूखने इंडस्ट्रीत येण्याअगोदर प्रचंड श्रम घेतले आहे. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु एकेकाळी शाहरूखची कमाई ५० रुपये ऐवढी होती. पंकज उधास यांच्या एका कॉन्सर्टमध्ये केलेल्या कामाचे शाहरूखला ५० रुपये मिळाले होते. शाहरूखने व्यवसायातदेखील नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. केवळ पंधराशे रुपये घेऊन तो मुंबईत आला होता. 



अक्षयकुमार

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असलेल्या अक्षयकुमारचा जन्म अतिशय सामान्य परिवारात झाला आहे. आर्टिफिशियल ज्वेलरी विकणे, मार्शल आर्ट इन्स्ट्रक्टर, हॉटेलमध्ये वेटर आणि शेफ अशी विविध कामे करून अक्षयने स्वत:ला सिद्ध केले. आज अक्षयकडे एक यशस्वी अभिनेता म्हणून बघितले जाते, परंतु यासाठी त्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागले, हे वास्तव आहे. 



नवाजुद्दीन सिद्दीकी
अतिशय हटके आणि दमदार अभिनयाने केवळ निर्मात्यांचाच नव्हे तर सुपरस्टार्सचाही फेव्हरेट बनत असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने अतिशय कमी कलावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. नवाज एका शेतकरी कुटुंबातील आहे. आठ भावडांपैकी तो एक आहे. कुटुंबाला आर्थिक साह्य करता यावे म्हणून नवाजने मेडिकलमध्ये नोकरी केली. त्याचबरोबर वॉचमन म्हणूनही काम केले. पुढे अडीच हजार रुपये घेऊन तो बॉलिवूडच्या वाटेवर आला. आज त्याच्याकडे एक यशस्वी अभिनेता म्हणून बघितले जाते. 



बोमन ईरानी
अनेकांना माहिती आहे की, बोमन एका फरसाणच्या दुकानात काम करीत होते. त्याव्यतिरिक्त त्यांनी वेटर म्हणूनही काम केले. त्याचबरोबर ताजमहल हॉटेलच्या रूम सर्व्हिस स्टाफचे सदस्य म्हणून ते काम करीत होते. इंडस्ट्रीमध्ये त्यांचे करिअर तेव्हा सुरू झाले जेव्हा लोक रिटायर होण्याचा विचार करतात. अशातही आज बोमन एक यशस्वी अभिनेता आहेत. 



राकेश ओमप्रकाश मेहरा
‘रंग दे बसंती’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे राकेश ओमप्रकाश मेहरा यांची कथाही काहीशी अशीच आहे. राकेश यांनी ज्या पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध केले ते खरोखरच प्रेरणादायी म्हणावे लागेल. कदाचित तुम्हाला माहिती नसेल परंतु राकेश चित्रपटांच्या सेट्सवर कलाकारांना चहा देण्याचे काम करीत असत. या व्यतिरिक्त त्यांनी व्हॅक्यूम क्लीनर विकण्याचेही काम केले आहे. 



राखी सावंत
चित्रपट ते राजकारण असा प्रवास करणारी राखी सावंत अनेकांना तिच्या वादग्रस्त वाणीमुळे आठवते. परंतु इथपर्यंतचा तिचा प्रवास जाणून घेतल्यास धक्का बसल्याशिवाय राहत नाही. मुंबईतील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या राखीने अगदी कमी वयात काम करण्यास सुरुवात केली. तिने डोर टू डोर सेल्सगर्ल म्हणून काम केले. चित्रपटात एक डान्सर म्हणून ओळख मिळण्याअगोदर राखीने गरिबीला कडवी टक्कर दिली. 

Web Title: Worked hard, crooked; Read 'or' Stars Success Story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.