तापसी पन्नू करणार ह्या दिग्दर्शकासोबत काम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 09:00 PM2019-01-21T21:00:00+5:302019-01-21T21:00:00+5:30
आता भन्साळी नव्या प्रोजेक्टच्या कामाला लागले असून सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू दिसणार आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत संजय लीला भन्साळीच्या नावाचा देखील समावेश आहे. त्याचा गेल्या वर्षी पद्मावत चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. या चित्रपटाने तीनशे कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यामुळे भन्साळीसोबत काम करण्याची इच्छा प्रत्येक कलाकाराची असते. आता भन्साळी नव्या प्रोजेक्टच्या कामाला लागले असून सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू दिसणार आहे.
भन्साळी सध्या यंदाच्या वर्षातील नवीन चित्रपटाच्या तयारीत असल्याने अनेक कलाकार त्यांच्या या चित्रपटात काम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या कलाकारांमध्ये आता तापसी पन्नू हिचे नावही जोडण्यात आले आहे. कारण संजय लीला भंसाली यांच्या जुहू स्थित ऑफिसच्या बाहेर शुक्रवारी सायंकाळी तिला पाहण्यात आले. यावेळी ती एका तासाहून अधिक वेळ ऑफिसमध्ये होती.
दरम्यान, भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण ही जोडी पुन्हा एकदा झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र, चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या मते भन्साळी यावेळी चित्रपटात नवीन प्रयोग करू इच्छित आहेत. अनेक वेळा भन्साळीच्या चित्रपटात दोन नायिकांनीही काम केलेले आहे. त्यामुळे दीपिका आणि रणवीरसह तापसीही चित्रपटात काम करू शकते.
दिग्दर्शक अनुराग बासूच्या 'लाइफ इन मेट्रो' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये तापसीची निवड केली असल्याची चर्चा होती. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. मेट्रो चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आदित्य रॉय कपूरच्या अपोझिट तापसी पन्नूला कास्ट करण्यात आले होते. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसी या चित्रपटाचा भाग नसणार आहे. तापसीने या चित्रपटाच्या शूटिंगकरिता अनुराग यांच्याकडे तारखांचा तपशील मागितला होता, परंतु अनुराग बासू याविषयी निश्चित काही सांगू शकले नाहीत. त्यामुळे त्यानंतर तापसीने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. तापसीने यापूर्वीच आपला आगामी चित्रपट वूमनियाच्या चित्रीकरणाला सुरू केले आहे.